मुंबई : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडली याची आज (सोमवार) पासून विशेष मोक्का कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू झाली आहे. या वेळी हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाबाबत हेडलीने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. पाकिस्तानमध्येच दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण मिळाले होते. तसेच लष्कर – ए- तोयबाच्या साजिद मीर याने भारतीय पासपोर्ट मिळवून दिला होता, अशी कबुली हेडलीने दिली आहे. हेडलीच्या या कबुलीने मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग अधिक स्पष्ट झाला असून, त्यांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.
सध्या हेडली अमेरिकेमध्ये २६/११च्या हल्ल्याबद्दल ३५ वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याला मुंबईतील खटल्यात आरोपी करण्याऐवजी माफीचा साक्षीदार करण्यास सरकार पक्षातर्फे अनुमती देण्यात आली आहे. त्यानुसार त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू झाली आहे. या साक्षीत त्याने बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन जीवन आणि पाकिस्तानमध्ये मिळालेले दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण याबाबत माहिती दिली.
मी लष्कर – ए- तोयबाशी इमान राखून होतो. अमेरिकी नावाने मला भारतात प्रवेश करायचा होता. म्हणून मी नाव बदलले. त्यानंतर मी पाकिस्तानला भेटी दिल्या. नाव बदलल्यानंतर ‘लष्कर’च्या साजिद मीरला भेटलो. त्याला सर्व माहिती दिली. त्याने मला भारतीय पासपोर्ट मिळवून दिला होता. भारतात उद्योग सुरू करावा, असे त्याचे म्हणणे होते. दरम्यान, पाकिस्तानमध्येच दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण मिळाले होते, अशी कबुली हेडलीने दिली.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स