हिंदु जनजागृती समितीचे आदर्श गणेशोत्सव २०१७ अभियान
मिरज : उत्सव साजरा करतांना तो शास्त्र समजून घेऊनच केला पाहिजे, तर त्याचा लाभ होतो. शाडूमातीची गणेशमूर्ती केल्यास प्रदूषणाचा प्रश्नच उद्भवत नाही. कृत्रिम कुंड, तसेच कागदी लगदा यांपासून मूर्ती सिद्ध करणे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच व्हायला हवे, असे मत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. गिरीश पुजारी यांनी व्यक्त केले. ते मिरज शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने येथे झालेल्या बैठकीत बोलत होते. बैठकीसाठी ३५ गणेशोत्सव मंडळांचे विविध असे ११० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
१. बैठकीत भाजपचे सांस्कृतिक आघाडीप्रमुख आणि मिरज शहर गणेशोत्सव समितीचे निमंत्रक श्री. आेंकार शुक्ल यांनी ‘गणेशोत्सव मंडळांनी धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करावा आणि वहात्या पाण्यातच श्रीगणेशमूर्ती विसर्जन करावे’, असे आवाहन केले.
२. श्री. गिरीश पुजारी यांनी वर्षभर सांडपाणी, तसेच कारखान्यांमुळे विविध नद्यांचे जे प्रदूषण होते, त्याची आकडेवारी सांगिल्यावर काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘हे सूत्र योग्य असून आम्ही वहात्या पाण्यात विसर्जनच करू’, असे सांगितले. काही कार्यकर्त्यांनी आतापासून कुंडात विसर्जन केलेल्या मूर्ती शेतात टाकून देत असल्याच्या क्लिप व्हॉट्स अॅपवर येत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
शहरातील नगरसेवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी यांना निवेदन !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे श्री. जयगोंड कोरे, नगरसेवक श्री. निरंजन आवटी, अधिवक्ता वासुदेव ठाणेदार, श्री. किशोर भोरावत, रेल्वे सेनेचे श्री. संदीप शिंदे, नगरसेविका सौ. संगिता खोत, सौ. वैशाली कोरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.श्री. निरंजन आवटी यांनी ‘समितीने प्रबोधनपत्रके उपलब्ध करून दिल्यास ती मंडळांना वितरित करू’, असे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात