नंदुरबार : येथे श्री गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने प्रशासनाला उत्सवात येणार्या अडचणी आणि महामंडळाच्या मागण्या यांचे निवेदन देण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. २३ जुलै या दिवशी पार पडलेल्या बैठकीत उत्सवकाळात उद्भवणार्या समस्या, अनुमती घेण्यात येणार्या अडचणी यांवर चर्चा करण्यात आली.
निवेदनात नमूद केलेल्या अडचणी आणि मागण्या
१. गणेशोत्सव मंडळांना घ्यावी लागणारी विविध विभागांशी संबंधित असलेली अनुमती एकाच खिडकीतून देणे चालू करण्यात आले असले तरी काही तालुक्यांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. ती सर्व तालुक्यांमध्ये करण्यात यावी आणि जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांना या कार्यपद्धतीची माहिती देण्यात यावी.
२. अनुमती घेतांना गणेशोत्सव मंडळांना शपथपत्र (अॅफिडेवीट) देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही जाचक अट रहित करण्यात यावी.
३. अनुमती प्रक्रियेत संबंधित गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक नसावे.
४. उत्सवाच्या काळात आणि अन्य वेळीही उघड्यावरील मांसविक्री वाद निर्माण करत असल्याने त्याला कायमस्वरूपी पायबंद घालून कायदेशीर कठोर कारवाई करावी.
५. गणेशोत्सव मंडळांची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसिलदार, स्थानिक पोलीस निरीक्षक, वीज वितरण आस्थापन, आदी संबंधित विभागांच्या अधिकार्यांसमवेत तातडीने बैठक घेण्यात येऊन त्यात गणेशोत्सवाविषयी चर्चा करण्यात यावी.
६. प्रकाशा येथे मूर्तीविसर्जनासाठी थेट तापी पात्रात जाण्याची सोय नसल्याने अनेक जण पुलावरून मूर्ती पाण्यात फेकतात. मागील वर्षी प्रशासनाने यावर पर्याय म्हणून वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यावर्षीही तशी सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच संबंधित ठिकाणी पुरेसा प्रकाश मिळेल याचीही योजना करावी.
७. विसर्जन मार्गावरील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे अपघात होत असल्याने त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती केली जावी. यासह गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात येऊन वाहनांना बंदी करण्यात यावी. मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा.
८. मूर्तीविसर्जनाच्या दिवशी किंवा गणेशोत्सवाच्या काळात पथदिवे बंद असणे, वीज खंडित करणे हे प्रकार थांबवले जावेत. पालिकेला पथदिवे दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात यावेत.
९. गणेशोत्सव काळात महिला आणि मुली यांची छेडछाड करणार्यांचा बंदोबस्त केला जावा आणि सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात करण्यात यावे.
१०. मूर्तीदान करणे, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती, मूर्ती तसेच निर्माल्य कचर्याच्या गाडीतून वाहून नेणे, या धर्मविरोधी प्रकारांना पायबंद घातला जावा.
११. कागदी गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याचे हरित लवादाने म्हटले असून अशा मूर्तींची विक्री करू नये.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात