Menu Close

गोवंशियांच्या हत्या प्रकरणांची नोंद न घेतल्यास आंदोलन करू ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

(उजवीकडे) विश्वास नांगरे-पाटील यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर : जिल्ह्यात गोवंशाच्या कत्तलीसाठी खरेदी आणि विक्री करणारे दलाल आणि कसाई यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्याची कारवाई करावी. गोवंशाची होणारी अमानुष हत्या प्रकरणाची योग्य नोंद न घेतल्यास आणि संबंधित दलाल यांच्यावर कारवाई न केल्यास शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, अशी चेतावणी शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना २५ जुलैला दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली.  या वेळी नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘गोवंशियांची विक्री करणारे दलाल आणि कत्तली करणारे कसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याविषयी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कळवले जाईल; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी कायदा हातात घेऊन कोणतेही कृत्य करू नये.’’ (हिंदुत्वनिष्ठांनी असे निवेदन दिल्यावर त्यांना कायदा हातात न घेण्यास सांगणाऱ्यांनी पूर्वीच अशा दलालांवर कायदेशीर कारवाई का केली नाही ? कायदा असूनही अवैध गोष्टींवर तत्परतेने कारवाई न करणारे पोलीस कर्तव्यचुकार कि भ्रष्ट ? – संपादक, संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी हिंदू महासभेचे शहराध्यक्ष श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या सौ. रश्मी आडसुळे, श्रीमती सुवर्णा पोवार, शिवसेनेचे सर्वश्री महेश सुतार, किशोर घाटगे, यांसह अन्य शिवसैनिक, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. गोविंदराव देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधाकर सुतार आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. पारगांव आणि परिसरातील शिवसैनिक आणि हिंदुत्वनिष्ठ असून वडगांव येथे प्रती सोमवारी जनावरांचा आठवडी बाजार भरतो. त्या बाजारात मुंबई, कल्याण, पुणे, सातारा, कोरेगांव, मिरज, कर्नाटक आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात कसाई येतात.

२. त्यांच्या स्थानिक दलालांच्या माध्यमातून गोवंशियांची मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी खरेदी केली जाते आणि त्या दलालांच्या माध्यमातून जनावरांची अनधिकृत वाहतूकही केली जाते.

३. गोवंश हत्या बंदीचा कायदा धाब्यावर बसवून जनावरांची खरेदी-विक्री आणि वाहतूक चालू आहे.

४. हिंदुत्वनिष्ठ आणि गोरक्षक कार्यकर्ते याचा जाब विचारायला गेले असता त्यांना  अॅस्ट्रोसिटी, खंडणी किंवा महिलांचा विनयभंग केल्याचे खोटे खटले प्रविष्ट करण्याची धमकी देण्यात येते.

५. त्यामुळे समाजात फूट पडून जातीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. तरी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *