अलवर (राजस्थान) येथे ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’ सभेचे आयोजन
अलवर (राजस्थान) : शासनकर्त्यांकडून काश्मीर समस्या चुकीच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. काश्मीरमध्ये जसा वंशविच्छेद झाला, तसा आज बंगाल, केरळ, कर्नाटक यांसह संपूर्ण भारतात होत आहे. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा या वंशविच्छेदावर एक उपाय आहे. काश्मिरी हिंदू मातृभूमीत परत गेले, तर जिहादला धक्का बसणार आहे, असे प्रतिपादन पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी केले.
येथील महावार धर्मशाळेत ‘हिंदु शक्ती वाहिनी’ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’ या सभेचे आयोजन केले होते.
या सभेला पनून कश्मीरचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. कमल हाक, पनून कश्मीरचे महासचिव श्री. कुलदीप रैना, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे श्री. विठ्ठल चौधरी, हिंदु शक्ती वाहिनीचे अध्यक्ष श्री. प्रेम गुप्ता आणि सचिव श्री. राजन गुप्ता, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. प्रेम गुप्ता आणि श्री. राजन गुप्ता यांच्या तळमळीमुळे सभेचे आयोजन
गोवा येथे जून २०१७ मध्ये आयोजित ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’मध्ये सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘एक भारत अभियान-चलो कश्मीर की ओर’ ही चळवळ जलदगतीने पुढे नेण्याचे ठरवले होते. या अधिवेशनात अलवर येथून आलेले हिंदु शक्ती वाहिनीचे अध्यक्ष श्री. प्रेम गुप्ता आणि सचिव श्री. राजन गुप्ता यांनी काश्मीरसह जम्मू येथील हिंदूंची विदारक स्थिती ऐकली. त्यांनी ‘ही माहिती अलवर येथील हिंदूंनाही कळावी’, याचा निश्चय केला आणि या सभेचे आयोजन केले.
देशभरातील सैनिकांनी काश्मीरसाठी बलिदान दिलेे ! – श्री. अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
आज ३५ टक्के काश्मीर आपल्या हातात नाही. हिंदूंनी त्यांच्या आई-बहिणींवर झालेले अत्याचार विसरावे, असे शासनकर्त्यांना वाटते. हे कसे शक्य आहे ? सरकारने काश्मिरी हिंदूंना २० लाख रुपयांचा प्रस्ताव दिला; मात्र त्यांच्यापैकी एकानेही हा प्रस्ताव स्वीकारला नाही. यातून त्यांचा आत्मसन्मान दिसून येतो. आज भारताच्या सर्व राज्यांच्या सैनिकांनी काश्मीरच्या रक्षणासाठी त्यांचे बलीदान दिले, हे सरकारने विसरू नये. चुकीच्या राजकीय धोरणांमुळे आमच्या सैनिकांचे प्राण जात आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात