सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात सव्वा लक्ष रुद्राक्षांपासून निर्माण करण्यात आलेल्या शिवलिंगाच्या दर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. श्रावण मासाचे औचित्य साधून पहिल्या सोमवारी मोठ्या भावपूर्ण वातावरणात दर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला.
या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रमोद यादव, साहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. ईश्वर सूर्यवंशी आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वेदमूर्ती श्रीकृष्णशास्त्री जोशी आदी उपस्थित होते. हे शिवलिंग १८ फूट उंचीचे असून मान्यवरांच्या शुभहस्ते शिवलिंगाला अभिषेक करण्यात आला. गुजरात येथील दवे शास्त्री यांनी त्यांच्या सहकार्यांसह निर्माण केलेल्या या शिवलिंगाचेे दर्शन भाविकांना संपूर्ण श्रावण मासात केव्हाही घेता येणार आहे. या काळात मंदिरात गणहोम, लक्ष्मीपूजन, सौभाग्यलक्ष्मीपूजन, श्रीसत्यनारायण महापूजा, सरस्वती पूजन, नवग्रह पूजन होणार आहे. सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रावण मासात ही पूजा झाल्यानंतर शिवलिंगासाठी उपयोगात आणलेले रुद्राक्ष भाविकांना वाटण्यात येणार आहेत. तरी समस्त भाविकांनी मंदिरात नावनोंदणी करावी आणि हे रुद्राक्ष प्रसाद म्हणून घ्यावेत, असे आयोजकांनी कळवले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात