केवळ हिंदूंच्या मंदिरांवरच महापालिका कारवाई करते, हे लक्षात घ्या !
मुंबई : दादर भागातील भवानी शंकर मार्गावर असलेल्या सैतान चौकी परिसरातील ७५ वर्षे जुन्या गोल्फादेवी मंदिराला महापालिकेने तोडक कारवाईची नोटीस बजावल्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी आगरी समाजाचे शेकडो भक्त आणि स्थानिक रहिवासी २५ जुलै या दिवशी मंदिराच्या परिसरात जमले. या वेळी गोल्फादेवी मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. गोल्फादेवी-शीतला माता मंदिर हे आगरी समाजातील देवीभक्तांनी १९४२ साली बांधले आहेे. दादर परिसरातील जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. मंदिराला नोटीस दिल्यापासूनच आगरी समाज बांधवांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यामुळे सैतान चौकी परिसरात शेकडो भक्तगण गोळा झाले होते. भक्तांचा रोष लक्षात घेऊन स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली आणि भक्तगणांना घेऊन पालिकेच्या जी उत्तर कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चाला प्रवेशद्वारावर अडवण्यात आले. त्यानंतर आमदार कोळंबकर यांच्यासह मंदिराच्या विश्वस्त मंडळींनी पालिकेचे साहाय्यक आयुक्त रमांकांत बिरादार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यामुळे मंदिरावरील कारवाई तुर्तास टळली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात