-
इस्कॉनच्या पैशांतून हिंदूंचे धर्मांतर होत असल्याचा आरोप !
-
हिंदूंनी इस्कॉनच्या मंदिरांत अर्पण न करण्याचे आवाहन !
प्रयाग : ज्योतिष आणि द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथील मनकामेश्वर मंदिरात ७ फेब्रुवारीला आयोजित पत्रकार परिषदेत काही महत्त्वाची विधाने केली. शंकराचार्य म्हणाले की, इस्कॉनच्या मंदिरात अर्पण करण्यात येणारा पैसा अमेरिकेत पाठवला जातो; कारण इस्कॉनची नोंदणी अमेरिकेत आहे. या पैशाची चौकशी करण्यात यावी; कारण हा पैसा परत हिंदूंच्या धर्मांतरासाठी भारतात पाठवला जातो.
इस्कॉनची (इंटरनॅशनल सोसायटी फॉर क्रिष्णा कॉन्श्यसनेसची) जगभरात १००० हून अधिक मंदिरे आणि ५५० केंद्रे आहेत. याची स्थापना १९६६ मध्ये स्वामी प्रभूपाद यांनी केली होती.
१. शंकराचार्य पुढे म्हणाले की, इस्कॉनच्या अनुयायींना विचारा की, ते वृंदावनमध्ये राधे-राधे म्हणत मंदिर बांधतात; परंतु झारखंड, छत्तीसगड आणि आसाममध्ये जाऊन ते मंदिर का बांधत नाहीत ?
२. ते यासाठी तेथे जात नाहीत कारण तेथे त्यांचे ख्रिस्ती बांधव हिंदूंच्या धर्मांतराचे कार्य करत आहेत.
३. स्वामी प्रभुपाद यांनी ज्या उद्देशाने इस्कॉनची स्थापना केली होती, त्याच्या विरुद्ध काम आता ही संस्था करत आहे. सनातन धर्माच्या विरोधात जाऊन ही संस्था हिंदूंना ख्रिस्ती बनवण्याचे काम करू लागली आहे.
४. हिंदूंनी इस्कॉनच्या मंदिरात जाण्याऐवजी भारतियांच्या मंदिरातच जावे आणि अर्पण करावे.
हिंदु राष्ट्राच्या गोष्टी करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अरुणाचल प्रदेशातील स्वयंसेवक खातात गोमांस !
एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते हिंदु राष्ट्राच्या गोष्टी करतात, तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचे स्वयंसेवक गोमांस खातात आणि संघ अशांना आपल्या संघटनेत ठेवतो, अशी टीकाही शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केली.
मी काँग्रेसी नाही !
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, मला काँग्रेसचा समर्थक समजले जाते; परंतु मी काँग्रेसी नाही, तर शंकराचार्य आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात