१. अफझलखानाची बाजू घेणारे पुढील प्रश्नांची उत्तरे देतील का ?
अफझलखानाविषयी ममत्व भाव असणार्यांनी, शिवरायांनी अफझलखानाचा वध का केला ?, या प्रश्नाचे उत्तर द्यावे. अफझलखान हा जर राज्य विस्तारासाठी आला होता, तर त्याला कोणाच्या राज्याचा विस्तार करायचा होता ? अफझलखान हा विजापूरच्या आदिलशाहचा एकनिष्ठ सरदार होता. त्यामुळे तो त्याच्या राज्याचा विस्तार करण्यासाठीच आला होता. आदिलशाह जर या देशाचा राजा होता, तर शिवाजी महाराजांनी त्याचा सरदार असलेल्या अफझलखानाचा वध का केला?
२. अफझलखानाचे समर्थन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष होते, हे नाकारणे !
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहच्याच नव्हे, तर त्याकाळात अस्तित्वात असलेल्या कोणत्याही इस्लामी राजसत्तेत सहभागी होऊन त्यांच्या पदरी सरदार होण्याऐवजी हिंदवी स्वराज्याची शपथ का घेतली ? त्यावेळच्या सर्व परकीय इस्लामी सत्तेच्या विरोधात शिवरायांनी रणशिंग का फुंकले ? आदिलशाह आणि अफझलखान यांच्या विरोधात लढणारे शिवराय हे राष्ट्रपुरुष नाहीत, असेच अफझलप्रेमींना सांगायचे आहे.
३. अप्रत्यक्षपणे शिवाजी महाराजांशी वैरभाव बाळगणार्या अफझलखानप्रेमींनी याचा शांतपणे विचार करणे आवश्यक !
शिवरायांनी अफझलखानाचा वध केला. त्यामुळे एकाच वेळी शिवराय आणि अफझलखान यांना राष्ट्रपुरुष म्हणता येणार नाही. अफझलखान हा या देशाचा शत्रू आहे, हे निश्चित आहे. शिवराय सज्जनांना देहदंड देणारे राज्यकर्ते नव्हते, हे जगमान्य आहे. जर अफझलखान हा सज्जन होता, असे त्याच्या प्रेमींना वाटत असेल, तर शिवराय हे अफझलखानाचे खुनी ठरतात. अफझलप्रेमी शिवरायांना खुनी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत का ? शत्रूचा शत्रू हा मित्र असतो. हे जगमान्य सूत्र आहे. शिवरायांच्या लेखी अफझलखान शत्रू होता आणि अफझलखानाची बाजू घेणारे या जगमान्य सूत्रामुळे शिवरायांचे शत्रू ठरतात. अफझलखानप्रेमींनी शांतपणे याचा विचार करावा आणि वर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शिवराय आणि अफझलखान यांपैकी कोणा एकाचीच बाजू घ्यावी. आम्हा शिवप्रेमींच्या लेखी अफझलखानाची बाजू घेणारी प्रत्येक व्यक्ती शिवरायांशी वैरभाव बाळगत आहे. यावर आम्हाला काही वाद-प्रतिवाद करावयाचा नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परूळकर, व्याखाते आणि लेखक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात