गुडगाव (हरियाणा) : मेवातच्या मॉडल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नमाज पढायला लावल्याने दोन शिक्षकांना शाळेतून निलंबित करण्यात आले आहे. धर्मांतर करण्याच्या उद्देश्यानेच विद्यार्थ्यांना नमाज पढविण्याची जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोपही या शिक्षकांवर ठेवण्यात आला आहे.
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी उपायुक्त मनीराम शर्मा यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आधी आम्ही वसतिगृहात राहत होतो. तेंव्हा काही विद्यार्थी आमच्यावर नमाज पढण्यासाठी दबाव टाकत होते. एवढेच नव्हे तर मुस्लिम शिक्षकही धर्मांतरासाठी आमच्यावर दबाव टाकत होते. शाळेतील एक शिक्षक मोइनुद्दीन सतत त्रास देत होते, अशी तक्रार या विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मोइनुद्दीनसह एका शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले. तर आरिफ नावाच्या शिक्षकाची फिरोजपूर झिरका येथे बदली करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या शाळेचे मुख्याध्यापक नवीन शक्ति यांनीही या कारवाईला दुजोरा दिला आहे.
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स