-
हिंदु जनजागृती समितीची पुणे महापालिकेला चेतावणी
-
‘अमोनियम बायकार्बोनेट’साठीचा निधी शाडूच्या मूर्ती बनवणार्या मूर्तीकारांना अनुदान म्हणून देण्याची मागणी
पुणे : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी ‘अमोनियम बायकार्बोनेट’चा वापर करण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या धर्मविरोधी निर्णयाचा मागील वर्षी फज्जा उडाला. असे असतांना यंदाही पालिका प्रशासनाने १०० टन ‘अमोनियम बायकार्बोनेट’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी बहुतांश मूर्ती विरघळल्याच नाहीत, तर काही मूर्ती विरघळण्यास पुष्कळ दिवस लागले. ‘अमोनियम बायकार्बोनेट’मुळे अनेकांच्या शरिरावर ओरखडे (रॅशेस्) आले, तर काहींनी ते पाणी झाडांना घातल्याने झाडेच मृत झाली. इतके होऊनही पालिका प्रशासन या अघोरी आणि जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली अन्य दुष्परिणाम करणार्या अंधश्रद्धाळू निर्णयावर ठाम आहे. पालिकेने हा निर्णय मागे घेतला नाही, तर हिंदु जनजागृती समिती तीव्र आंदोलन छेडेल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. पुणेकरांकडून कररूपात घेतलेल्या लाखो रुपयांचा अशा प्रकारे चुराडा करण्याचा पालिका प्रशासनाला अधिकार नाही. त्यामुळे पालिकेने हा निर्णय मागे घ्यावा. पालिकेला जलप्रदूषण रोखण्याचा इतकाच पुळका असेल, तर हे लाखो रुपये अमोनियम बायकार्बोनेटवर व्यय न करता शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी अनुदान म्हणून मूर्तीकारांना द्यावेत.
२. यातून वास्तविक ‘इको फ्रेंडली’ आणि धर्मशास्त्रसुसंगत शाडूच्या मातीची नैसर्गिक रंगात रंगवलेली श्री गणेशमूर्ती भाविकांना उपलब्ध होईल. हिंदूंना धर्मपालनही करता येईल आणि ‘मूर्तीविसर्जनाने जलप्रदूषण होते’, हा पालिकेने निर्माण केलेला बागुलबुवाही फोल ठरेल.
३. पालिकेला जलप्रदूषणाची इतकीच चिंता असेल, तर वर्षातील ३६५ दिवस पुण्यातील नद्यांमध्ये विनाप्रक्रिया सोडले जाणारे १६८ दशलक्ष लिटर अतीदूषित सांडपाणी, आस्थापनांतून सोडले जाणारे रसायनमिश्रित पाणी, बांधकाम व्यावसायिकांकडून नदीपात्रात टाकला जाणारा राडारोडा, यांसारख्या असंख्य गोष्टींमुळे नदीचे खरेतर ९९ टक्क्यांहून अधिक पाणी प्रदूषित होत आहे; मात्र पालिका प्रशासन यांकडे सोयीस्करपणे कानाडोळा करते. याला पालिका प्रशासनाचा पुरोगामीपणा म्हणायचा कि विवेकवाद ?
४. हिंदु धर्मशास्त्र सांगते की, १० दिवस पूजलेली श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित केल्यास तिच्यातील गणेशतत्त्व पाण्यासह सर्वदूर पसरून वातावरणाची शुद्धी होते; मात्र हिंदुविरोधी असलेल्या तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या धार्मिक गोष्टींमध्ये विघ्ने आणत धर्मविरोधी निर्णय घेतले. आता हिंदुत्वनिष्ठ भाजपकडे पालिकेची सत्ता असतांनाही असे धर्मविरोधी निर्णय घेतले जाणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात