-
नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या प्रयत्नांना यश !
-
महामंडळाला जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आश्वासन
नंदुरबार : शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांची स्वतंत्र बैठक बोलावू आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मांडलेल्या सर्व मागण्यांवर आणि सूत्रांवर चर्चा करू, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, श्री बाबा गणपतीचे सुनिल सोनार, भाऊ गणपतीचे वसंत सोनार, बंटी नेतलेकर, राम कडोसे, महाराणा प्रताप मंडळाचे चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत आदींचा सहभाग होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी मागण्या वाचून झाल्यावर सांगितले की, आपल्या मागणीप्रमाणे सर्वविभाग प्रमुखांसमवेत केवळ गणेशोत्सव मंडळांचा सहभाग असलेली बैठक सप्ताहाअखेर आयोजित केली जाईल आणि सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयालाही शिष्टमंडळाने निवेदन दिले.
२३ जुलैला सार्वजनिक गणेशोत्सवात येणार्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी महामंडळांतर्गत शहरातील गणेशोत्सव मंडळांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. त्यात शहरातील मंडळांचे ११० पदाधिकारी उपस्थित होते. त्यात चर्चेअंती जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्याचा निर्णय झाला.
निवेदनातील मागण्या
१. गणेशोत्सव मंडळांना सर्व प्रकारच्या अनुमती एक खिडकीतूनच उपलब्ध करून देण्याची प्रभावी कार्यवाही सर्व तालुक्यांमधे व्हावी.
२. मंडळांना बंधनकारक केलेली शपथपत्राची (अॅफिडेवीट) अट शिथील करावी.
३. अनुमतीचे अर्ज ऑनलाईन भरणे मंडळांना बंधनकारक नसावे.
४. गणेशोत्सव काळात आणि अन्य काळातही उघड्यावरील मांसविक्रीला पायबंद घालावा.
५. प्रशासनाने केवळ गणेशभक्त, गणेशोत्सव साजरा करणार्या संस्था, संघटना यांचाच समावेश असलेली गणेश मंडळांची स्वतंत्र बैठक घ्यावी. त्यात गणेशोत्सवाविषयी चर्चा व्हावी.
६. महिला आणि मुली यांना त्रास देणार्या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा. त्या भागात दामिनी पथक तैनात करावे.
७. मूर्तीदान करणे, कृत्रिम तलाव करून त्यात विसर्जन करणे, कचर्याच्या गाडीतून मूर्ती वाहून नेणे, निर्माल्य पालिकेच्या कचर्याच्या गाडीतून वाहून नेणे या धर्मशास्त्रविरुद्ध गोष्टींनी पायबंद घालावा.
८. कागदी लगद्यांपासून केलेल्या गणेशमूर्तींद्वारे जलप्रदूषण होत असल्याने त्यांची विक्री करू नये, असे परिपत्रक प्रशासनाने काढावे.
९. शहरातील विसर्जन मार्गावरील रस्त्यांची कायमस्वरूपी दुुरुस्ती व्हावी.
१०. प्रकाशा येथे मूर्तीविसर्जनासाठी थेट तापी पात्रात जाण्याची सोय नसल्याने अनेक जण पुलावरून मूर्ती फेकून देतात. तेथे वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनाची पर्यायी व्यवस्था करून द्यावी.
११. विसर्जनाच्या दिवशी किंवा गणेशोत्सवकाळात पथदिवे बंद असणे किंवा वीज खंडित होणे हे प्रकार थांबवावेत. पालिकेला पथदिवे दुरुस्त करण्याचे आदेश दिले जावेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात