गोहत्याबंदी कायदा करणार्या हरियाणाच्या खट्टर शासनाचे एकाएकी घुमजाव !
नवी देहली : मागील वर्षी गोवंश रक्षणासाठी कठोर कायदा करणार्या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी त्यांच्या मूळ भूमिकेत एकाएकी घुमजाव केला असून गोमांस भक्षणासाठी विदेशी पाहुण्यांना विशेष परवाना देण्याची सिद्धता दर्शवली आहे.
१. मुसलमानांना देशात रहायचे असेल, तर त्यांनी गोमांस खाणे सोडले पाहिजे, असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री खट्टर यांनी राज्यात गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन विधेयक कायदा पारित केला होता.
२. या कायद्याच्या अंतर्गत राज्यात गोवंशाची हत्या केल्यास ३ ते १० वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपये दंड, पशूवधगृहांसाठी गायींची निर्यात करणार्याला ३ ते ७ वर्षे कारावास आणि ३० ते ७० सहस्र रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाची हिंदुत्वादी संघटनांनी प्रशंसाही केली होती, तर काही मुसलमानांच्या संघटनांनीही याचे स्वागत केले होते.
३. परंतु आता खट्टर शासनाने विदेशी पाहुण्यांना गोमांस भक्षण करण्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या मते राज्यात रहाणार्या विदेशी लोकांना गोमांस खाण्याची अनुमती देण्यात येऊ शकते.
४. खट्टर यांनी स्पष्ट केले की, राज्यात हरिणाच्या परंपरांना लक्षात घेऊन गोहत्या बंदी करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची पद्धत असते. विशेषत: जे बाहेरच्या देशातून आले आहेत, त्यांना आमचा विरोध नाही.
५. द हिंदू या वृत्तपत्रातील माहितीनुसार मुख्यमंत्री खट्टर यांनी म्हटले आहे की, जर विदेशी नागरिकांसाठी काही प्रयत्न करावे लागले, तर शासन ते निश्चितपणे करील. त्यासाठी विशेष परवाना असू शकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात