सांगली : जगातील १० प्रथम लढायांपैकी बाजीराव पेशवे यांनी निजामासमवेत पालखेड येथे केलेल्या लढाईचा समावेश आहे. बाजीराव पेशवे यांच्यावर परदेशात अभ्यासक्रम आहे, तसेच पुस्तकेही निघाली आहेत. त्यांच्यावर इंग्रजीत चरित्र आहे. त्यांच्या लढायांना इंग्रज अधिकारी ग्रँट डफ यांनी मास्टरपीस, अशी उपाधी दिली आहे.
बाजीराव पेशवे यांची युद्धनीती अजोड होती. अशा पराक्रमी बाजीराव पेशव्यांचे चरित्र आम्ही दुर्दैवाने मस्तानीपुरते सीमित केले. त्यामुळे बाजीरावांसारख्या अद्वितीय आणि अपराजित योद्धाचे महत्त्व महाराष्ट्राला नाही, अशी खंत महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे इतिहास तज्ञ समितीचे सदस्य अधिवक्ता विक्रम एडके यांनी व्यक्त केली. ते ब्राह्मण सभा सांगली आणि लोकमान्य टिळक स्मारक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मस्तानी पल्याडचे बाजीराव या विषयावर बोलत होते. हे व्याख्यान लोकमान्य टिळक स्मारक येथे पार पडले.
या वेळी आमदार श्री. सुधीर गाडगीळ, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. केदार खाडिलकर, सर्वश्री तात्या बिरजे, माणिकराव जाधव, भूषण वाकणकर यांच्यासह सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिवक्ता विक्रम एडके पुढे म्हणाले,
१. संजय भन्साळी यांनी त्यांच्या चित्रपटात बाजीराव पेशवे यांचे चित्रण अत्यंत अयोग्य पद्धतीने केले आहे. बाजीरावांच्या आयुष्यात मस्तानी सोडून अन्य कितीतरी शिकण्यासारख्या बाबी आहेत. दुर्दैवाने आपण त्यांच्याकडे प्रेमवीर म्हणूनच पहातो. बाजीरावांचे युद्धकौशल्य असे आहे की त्यांच्या प्रत्येक युद्धावर एक चित्रपट होईल.
२. छत्रपती शिवाजी महाराज यांनी छत्रसाल राजा यांना ६० वर्षांपूर्वी दिलेला शब्द बाजीराव पेशवे यांनी पाळला आणि त्यांना साहाय्य केले.
३. ज्या काळात इतरांच्या फौजा दिवसाला १५/२० कि.मी. प्रवास करत त्या काळात बाजीराव पेशव्यांची फौज ६५ ते ७० कि.मी. प्रवास करत.
४. बाजीराव पेशवे यांनी त्यांचे स्वत:चे स्वतंत्र असे युद्धकौशल्य निर्माण केले होते. ते किल्ल्यांना जो वेढा देत तोच पुढे बाजीरावी वेढा म्हणून प्रसिद्ध झाला. हा वेढा कोणत्याही शत्रूला भेदणे अशक्य असे.
क्षणचित्रे
१. अधिवक्ता विक्रम एडके यांनी त्यांच्या व्याख्यानाचा प्रारंभ गायत्री मंत्राने केला.
२. कार्यक्रमस्थळी सनातन-निर्मित बाजीराव पेशवे यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.
३. चार वर्षांपूर्वी याच सभागृहात अधिवक्ता विक्रम एडके यांनी स्वा. सावरकर यांच्यावर प्रथम व्याख्यान दिले होते. त्यांच्या अभ्यासपूर्व व्याख्यानांमुळे आता त्यांना परदेशातही व्याख्यानांसाठी बोलावणे येते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात