प्रत्येक गावात बैठका घेऊन हिंदूंमध्ये जागृती करण्याचा धारकरी मेळाव्यात निर्धार
सातारा : फंदफितुरीमुळे हिंदु धर्माला शेकडो वर्षांपासून ग्रासले आहे. अशा फितुरांमुळेच छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. नंतर रायगडही शत्रूच्या कह्यात गेला. त्यामुळे त्याचे सर्व वैभव नष्ट करण्यात आले. ३२९ वर्षे होऊनही हिंदवी स्वराज्याचे सिंहासन पुन्हा स्थापन झाले नाही. या देशाला जितके भूदल, नौदल आणि वायूदल आवश्यक आहे, तितकेच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासनही आवश्यक आहे. हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास या सुवर्ण सिंहासनातच सामावला आहे. ज्या कठीण परिस्थितीशी दोन हात करत शिवछत्रपतींनी ते सिंहासन निर्माण केले, तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. अशा वेळी हे सिंहासनच हिंदु समाजात वीरश्री निर्माण करेल आणि हिंदूंना पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देईल, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात ३० जुलै या दिवशी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकरी मेळावा पार पडला. त्यात ते बोलत होते. दुर्गराज रायगडावर ३२ मणांच्या सुवर्ण सिंहासनाची पुनर्स्थापना करण्याविषयीही नियोजन करण्यात आले. पक्ष, संप्रदाय बाजूला ठेऊन केवळ शिव-शंभू भक्त म्हणून सर्वांनी सुवर्ण सिंहासन स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हावे, असेही ते या वेळी म्हणाले.
मेळाव्याला सातारा जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधून शेकडो धारकरी उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यात जाऊन या विषयाच्या संदर्भात जागृती करण्याचे दायित्व धारकर्यांनी उत्स्फूर्तपणे घेतले. गावागावांत जाऊन प्रत्येक हिंदूला या कार्यात सहभागी करून घेण्याचा निश्चयही या वेळी करण्यात आला.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन मांडले होते. तसेच सात्त्विक गणेशमूर्तींसाठी नावनोंदणी करण्यात आली.
२. मेळाव्यानंतर छत्रपती श्री. उदयनराजे भोसले यांच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शहरातून वाहनफेरी काढण्यात आली.
३. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून २० सहस्र जणांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.
सुवर्ण सिंहासनाचे निर्माण आणि दानधर्म करण्याची प्रक्रिया अतिशय सुटसुटीत, पारदर्शक आणि प्रामाणिक असेल. कोणत्याही प्रकारची पावतीपुस्तके छापण्यात येणार नाहीत. त्यासाठी विविध बँकांमध्ये ५ नवीन खाती उघडण्यात आली आहेत. त्यांचे खाते क्रमांक धारकर्यांकडून घेऊन त्यात आपापल्या परीने सर्वांनी दान करावे, असे आवाहन पू. भिडेगुरुजींनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात