जगभरातील काही प्रसिद्ध तीर्थस्थळांजवळ गरम पाण्याचे कुंड आढळून येतात. भारतामध्ये गरम पाण्याचे कुंड पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. भारतीय भू-वैज्ञानिकांनी भारतातील विविध भागांमधील गरम पाण्याच्या कुंडांचा अभ्यास केला आहे. परंतु या कुंडांमधील पाणी प्रत्येक ऋतूमध्ये कसे काय गरम राहते, हे रहस्य अजूनही कायम आहे.
१. यमुनोत्री (उत्तराखंड)
यमुनोत्री उत्तराखंड राज्यात यमुना नदीचे उगम स्थळ मानले जाते. यमुनोत्रीच्या जवळच विविध कुंड तयार झालेले आहेत, ज्यामधील सूर्यकुंड गरम पाण्याचे प्रसिद्ध कुंड आहे. या कुंडातील पाणी एवढे गरम राहते की, हातामाध्येही घेतले जाऊ शकत नाही. भक्त या कुंडातील पाण्याने भात शिजवून घेतात.
२. मनीकरण, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील कुल्लूपासून ४५ किलोमीटरवर मनीकरण ठिकाण असून, येथील पाणी खूप गरम आहे. येथील पाण्यामध्ये सल्फरचे जास्त प्रमाण असून युरेनियम आणि इतर रेडियोएक्टिव तत्व आढळून येतात. या पाण्याचे तापमान खूप जास्त आहे. हे स्थान हिंदू आणि शीख लोकांचे श्रद्धाकेंद्र आहे.
३. तुळस-श्याम कुंड (गुजरात)
तुळस-श्याम कुंड, जुनागढपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे गरम पाण्याचे तीन कुंड आहेत. येथील खास गोष्ट म्हणजे, तिन्ही कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे राहते. या कुंडाजवळच ७०० वर्ष जुने रुख्मिणी देवीचे मंदिर आहे.
४. ओडिशा येथील अत्री जलकुंड
ओडिशा येतील अत्री जलकुंड सल्फरयुक्त गरम पाण्यामुळे प्रसिद्ध आहे. हे जलकुंड भुवनेश्वरपासून ४२ किलोमीटरवर आहे. या कुंडातील पाण्याचे तापमान ५५ डिग्री आहे. या कुंडात स्नान केल्यास थकवा दूर होऊन शरीरात उर्जा निर्माण होते.
५. बकरेश्वर जलकुंड पश्चिम बंगाल
हे पश्चिम बंगाल येथील एक प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. या कुंडातील गरम पाण्यात स्नान करण्यासाठी देश-परदेशातून अनेक भाविक येतात. या कुंडात स्नान केल्याने विविध आजार नष्ट होतात.
६. युमेसडोंग सिक्कीम
युमेसडोंग सिक्कीम येथील सर्वात प्रसिद्ध स्थळांमधील एक आहे. उत्तर-पूर्व राज्यामध्ये स्थित असलेले हे कुंड १५५०० फुट उंचीवर आहे.
७. पनामिक (लडाख)
नुब्रा व्हॅलीचा अर्थ फुलांची घाटी. ही व्हॅली सियाचीन ग्लॅशियरपासून ९ किलोमीटरवर आहे. हे ठिकाणी गरम पाण्याचे कुंडामुळेही ओळखले जाते. येथील पाणी खूप गरम आहे. पाण्यातून उकळ्या फुटलेल्या दिसतात.
८. राजगीर येथील जलकुंड
बिहार राज्यातील पाटणा शहराजवळील राजगीर क्षेत्र भारतातील सर्वात पवित्र स्थळांमधील एक स्थळ मानले जाते. प्राचीन काळी हे स्थळ मगध साम्राज्याची राजधानी होती. राजगीर केवळ एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ नसून सुंदर हेल्थ रिसॉर्ट स्वरुपात लोकप्रिय आहे. ते नागरी राजगीर सर्व धर्मांचे संगमस्थळ आहे. प्राचीन कथेनुसार ब्रह्मदेवाचे मानस पुत्र राजा वसुने राजगीर येथील ब्रह्मकुंड परिसरात एका यज्ञाचे आयोजन केले होते.
स्त्रोत : दिव्य मराठी