पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांची काही राजकीय उद्दिष्टे होती. सद्यपरिस्थितीत ती सफल झाली, असे काही जणांना वाटत असले, तर तो भ्रम आहे. हिंदुहिताची राजनीती प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. हीच खरी लोकमान्य टिळक यांना आदरांजली असेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभेचे प्रवक्ते श्री. दिनेश भोगले यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट या दिवशी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी संघटनेचे श्री. गोविंद गांधी, प्रा. गजानन नेरकर, श्री. विजय गावडे उपस्थित होते. श्री. दिनेश भोगले यांनी त्यांच्या भाषणामध्ये लोकमान्य टिळक यांच्या प्रखर राष्ट्राभिमानी बाण्याच्या संदर्भातील काही स्फूर्तीदायी प्रसंगही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन नेरकर यांनी केले.
श्री. गोविंद गांधी म्हणाले, “लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचीच आज देशाला आवश्यकता आहे. त्यांनी ज्याप्रमाणे विदेशी वस्तूंची होळी केली होती, त्याप्रमाणे सर्वांनी विदेशी उत्पादनांवर बहिष्कार घालावा.”
“रिडल्स ऑफ राम अॅण्ड कृष्ण : एक परीक्षण, विश्लेषण आणि विचारमंथन” या पुस्तकाचे प्रकाशन
या प्रसंगी जागृती प्रकाशनच्या वतीने डॉ. वासुदेव गोडबोले (इंग्लंड) लिखित ‘रिडल्स ऑफ राम अॅण्ड कृष्ण : एक परीक्षण, विश्लेषण आणि विचारमंथन’ या पुस्तकाचे, तसेच ‘इ-बुक’चे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी प्रा. गजानन नेरकर म्हणाले, “प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण ही हिंदूंची दैवते आहेत. हिंदूंच्या श्रद्धा या दैवतांच्या चरणी आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आदरानेच लिहायला हवे. डॉ. आंबेडकर यांचा व्यक्ती म्हणून अनादर नसला, तरी डॉ. आंबेडकर यांनी राम, कृष्ण यांच्याविषयी केलेल्या टीकेचे खंडण करायलाच हवे. त्याच भूमिकेतून डॉ. गोडबोले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे. या पुस्तकामध्ये. आंबेडकर यांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर केलेल्या टीकेचे शास्त्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण खंडण केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात