मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.
लातूर : येथे जिल्हाधिकार्यांना दिलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी स्वीकारले. या वेळी सर्वश्री श्रीकांत साळुंखे, अर्जुन काटकर, नीलेश मोहळकर, प्रल्हाद वाघमारे, बिभीषण कोटमाळे, गणेश मोहळकर, मनोज स्वामी, नरसिंग कवडगावे, माधव कल्याणी, रविंद्र बावसकर, प्रशांत इनामदार, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
उपजिल्हाधिकार्यांनी कौतुक करत म्हटले, युवा वर्ग पाहून आनंद होतो. आतापर्यंत अशी कामे केवळ वयस्करांनी केल्याचेच पाहिले आहे. तुमच्या मागणीनुसार आम्ही समिती स्थापन केली आहे. त्यासंदर्भात सर्व कार्यालयांना कळवले आहे. इंग्रजी माध्यमातील शाळा, मदरसे किंवा अन्य ठिकाणी १५ ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण न झाल्यास आम्हाला कळवा. आम्ही संबंधितांवर कारवाई करू.
क्षणचित्र
निवेदन देण्याचे निश्चित झाल्यावर राष्ट्रप्रेमींनी २४ घंट्यांच्या आत तत्परतेने निवेदन दिले.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार श्री. दिनेश झांपले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवबाराजे प्रतिष्ठानचे श्री. अर्जुन साळुंके, काँग्रेसचे नगरसेवक सुनील रोचरीकर, आनंद रोचरीकर, सुधीर रोचरीकर, रोहित आडेकर, दीपक पलंगे, जगदीश पेंदे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : येथे नायब तहसीलदार ए.आर. पवार यांनी निवेदन स्वीकारले. तसेच दोन दिवसांत केलेल्या कार्यवाहीविषयी आम्ही हिंदु जनजागृती समितीला कळवू, असे आश्वासन त्यांनी दिले. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रबोधन कृती समिती स्थापन करावी, अशी मागणीही या वेळी शिष्टमंडळाने केली. या वेळी हिंदु महासभा पंढरपूर, अध्यक्ष बाळकृष्ण डिंगरे, शिवप्रतिष्ठानचे प्रतापसिंह साळुंखे, सौरभ थिटे, पेशवा युवा मंचचे सचिव गणेश लंके, परशुराम युवा मंचचे आेंकार कुलकर्णी, अधिवक्ता चंद्रशेखर पोरे, हिंदुत्वनिष्ठ प्रदीप बडवे, नितीन बोकन, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फलटण (जिल्हा सातारा) : येथील तहसीलदार श्री. विजय पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. बारामती प्रदूषणविरहित आणि धर्मशास्त्रसंमत गणेशमूर्तीची स्थापना करण्याविषयी प्रबोधन करण्यासाठी, तसेच १५ ऑगस्टच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी येथील पोलीस अधिकारी श्री. अजय गोरड आणि नायब तहसीलदार श्री. संजय पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वर्धा येथील शाळेतील मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सरस्वती विद्यालय, वर्धा येथे निवेदन देण्यासाठी गेल्यावर मुख्याध्यापक श्री. विनोद जक्कनवार यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातच क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्याची आणि राष्ट्रध्वजाच्या संदर्भात प्रवचन घेण्याची अनुमती दिली. या प्रदर्शनाचा लाभ १२५ विद्यार्थ्यांनी घेतला.
क्षणचित्रे
१. २ विद्यार्थिनींनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचा पत्ता मागितला.
२. मुख्याध्यापकांनी सनातनच्या ग्रंथांची मागणी केली. शिक्षकांनी क्रांतीकारकांचे प्रदर्शन अतिशय चांगले आणि स्वातंत्र्याचा परिचय करून देणारे असल्याचे सांगितले.
३. एका विद्यार्थिनीने समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.
राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी कार्यवाही करण्यासाठी चंद्रपूर आणि वर्धा येथे निवेदने
चंद्रपूर : येथील निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राम गरकर, तसेच वर्धा येथील निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी मंगेश जोशी यांनी प्रबोधनात्मक हस्तपत्रकाचे वाचन करून तसे आदेश निर्गमीत करण्याचे आश्वासन दिले.
ठाणे येथील महापौरांना निवेदन
ठाणे : येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेअंतर्गत महापौर सौ. मीनाक्षी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. धनश्री केळशीकर आणि धर्माभिमानी डॉ. आशिष देवळे उपस्थित होते.
पेण (जिल्हा रायगड) येथे शासन आणि प्रशासन यांना निवेदने
पेण : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार कृती समिती स्थापन करून त्यामध्ये सामाजिक संस्थांना सहभागी करून घ्यावे आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी विविध माध्यमांतून जागृती करावी, यासाठी पेण येथील तहसीलदार श्री. डी.एच्. कांबळे, पेण पोलीस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांना, तसेच पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. प्रीतम पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी सौ. प्रीतम पाटील यांनी नगरपरिषदेच्या सर्व शाळांतून हिंदु जनजागृती समितीने मुलांचे प्रबोधन करावे, असे सांगितले. या वेळी निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे पेण शहर युवासेनेचे श्री. चेतन मोकल आणि त्यांचे सहकारी, समितीचे श्री. जगन्नाथ जांभळे, तसेच सनातन संस्थेचे श्री. दिलदास म्हात्रे हे उपस्थित होते.
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये !
यवतमाळ येथील जिल्हाधिकार्यांचे आवाहन
सर्वच जिल्हाधिकार्यांनी अशा आवाहनाचे अनुकरण करावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
यवतमाळ : येथील जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून नागरिक, पोलीस, प्रशासन आणि विक्रेते यांना आवाहन केले की, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची कोणीही विक्री करू नये अथवा ते वापरू नयेत. स्थानिक पोलिसांनीही असे करणार्यांवर कारवाई करावी. रस्त्यावरील गोळा केलेले राष्ट्रध्वज तालुका आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणेस सुपूर्द करावे.
त्यांनी पुढे म्हटले की, राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था, विद्यार्थी, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी याची नोंद घेऊन पोलिसांचे साहाय्य घ्यावे.
हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासंदर्भात निवेदन दिले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात