केरळमधील लव्ह जिहादचे प्रकरण
नवी देहली : केरळमध्ये एका हिंदु युवतीने इस्लाम स्वीकारून मुसलमान तरुणाशी विवाह केल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला या संदर्भात पुरावे गोळा करण्याचा आदेश दिला आहे. तसेच हा अहवाल १० दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे. यापूर्वी केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाला लव्ह जिहाद संबोधून त्यांचा विवाह रहित करण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात मुसलमान तरुणाने काँग्रेस नेते अधिवक्ता कपिल सिब्बल आणि अधिवक्ता इंदिरा जयसिंह यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यात या तरुणाने म्हटले आहे की, ही युवती २४ वर्षांची सज्ञान आहे. तिला तीने कोणाशी विवाह करावा आणि कोणता धर्म स्वीकारावा हे ठरवण्याचा अधिकार आहे.
पीडित मुलीचे वडील के.एम्. अशोकन् यांच्या अधिवक्त्या माधवी दीवान म्हणाल्या की, पीडित युवतीला एका षड्यंत्राद्वारे विवाहासाठी सिद्ध करण्यात आले. या संदर्भात पुरावेही आहेत. यावर न्यायालयाने एन्आयएला अशोकन् यांच्याकडून पुरावे घेण्याचा आदेश दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात