शिरवळ (जिल्हा सातारा) येथे गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
शिरवळ (जिल्हा सातारा) : गणेशोत्सव, तसेच दहीहंडी उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात आले होते. समितीचे प्रा. विठ्ठल जाधव यांनी या प्रसंगी सण आणि उत्सव यांमागील धर्मशास्त्र समजून घेऊन ते साधना म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, “हिंदूंच्या उत्सवांना सध्या विकृत स्वरूप येत आहे. पृथ्वीवरील रज-तमात्मक वातावरणात स्वतःमधील सत्त्वगुण वाढण्यासाठी, तसेच चैतन्य निर्माण होण्यासाठी सण-उत्सव यांचे प्रयोजन आहे. त्यामुळे ते करमणूक म्हणून नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावर साजरे केले जावेत.” शिरवळ येथील पोलीस ठाण्यामध्ये २ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या बैठकीत ३० हून अधिक गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी पोलीस उपनिरीक्षक श्री. सुनील पवार यांनी उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे, तसेच डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
क्षणचित्रे
१. भोई आळी मानाच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समितीच्या उपक्रमांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
२. पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन समितीच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात