सर्वत्रच्या गणेश मंडळांनी असाच निर्णय घेतल्यास फटाक्यांवर नाहक खर्च होणारा देशातील पैसा वाचेल आणि प्रदूषणालाही आळा बसेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांदा बाजारपेठेत उद्भवणार्या वाहतुकीच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी शांतता समिती, बांदा व्यापारी संघ, रिक्शाचालक-मालक संघटना आणि बांदा पोलीस यांची संयुक्त बैठक १० ऑगस्ट या दिवशी पोलीस ठाण्यात झाली. प्रतिवर्षीप्रमाणे बांदा उभाबाजार येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत फटाके न वाजवण्याचा निर्णय यावर्षीही कायम ठेवण्यात आला. त्याचसमवेत वाहनतळ समस्या, महिलांसाठी शौचालय, गुन्हेगारी या विषयांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, वाहतूक पोलीस दत्तात्रय देसाई, जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ आणि अन्य उपस्थित होते.
गतवर्षीप्रमाणे यावर्षीही बांद्यातील कट्टा कॉर्नर, नट वाचनालय, केंद्रशाळा, कन्याशाळा ते खेमराज विद्यालय मार्ग, मशिदीजवळील मोकळी जागा या ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे, तसेच कट्टा कॉर्नर ते गांधी चौकातील श्री विठ्ठल मंदिरापर्यंतची वाहतूक एकेरी पद्धतीने करण्यात येणार आहे. महिलांसाठी शौचालयाची सोय उपलब्ध करण्याचे आश्वासन सरपंच बाळा आकेरकर यांनी दिले. गणेशोत्सवाच्या काळात होणार्या चोर्या टाळण्यासाठी पोलिसांची गस्त ठेवली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सणाच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी वीज महावितरण मंडळाला पत्र देण्याची सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात