१५ ऑगस्ट या दिवशी असलेल्या स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी उत्सव यांच्या निमित्ताने…
स्वातंत्र्यदिन म्हणजे देशासाठी प्राणार्पण केलेल्या क्रांतीकारकांचे स्मरण करण्याचा दिवस ! क्रांतीकारकांच्या बलीदानातून प्रेरणा घेऊन स्वत:मध्ये राष्ट्रप्रेेमाची जाणीव जागृत होणे अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना देशाविषयी खरंच आत्मीयता वाटते का ? असा विचार कधी कधी येतो; कारण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रस्त्यावर कागदी, प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतरत्र आणि अस्ताव्यस्त पडलेले असतात. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देणारा भारत हा जगातील एकमेव देश असेल. एकीकडे आपण देशाचा विजयोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो, तर दुसरीकडे राष्ट्रीय प्रतिकांचा मान राखण्याकडे दुर्लक्ष करतो, हे दुर्दैवी आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी उत्सव एकाच वेळी येत असल्याने ठिकठिकाणच्या गर्दीमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकाचे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी प्रबोधन होणे आवश्यक आहे. बांधवांनो, आतापासूनच राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देणार नाही, असा निश्चय करा. गोविंदांसह प्रत्येक नागरिक यादृष्टीने कृतीशील झाल्यास राष्ट्रीय अस्मिता जोपासली जाईल !
ध्वजसंहितेतील नियमांचे पालन करा !
भारतीय ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट किंवा कपडे घालणे, राष्ट्रध्वजातील ३ रंग तोंडवळ्यावर रंगवून घेणे, या रंगांमध्ये पताका लावणे, मंडप उभारणे, हा अपराध आहे. ध्वजसंहितेतील नियमांचे उल्लंघन कुणाकडूनच होऊ नये, यासाठी पुढील गोष्टी पाळा.
१. राष्ट्रध्वजाच्या रंगात दहीहंडी न रंगवणे, तोरण न लावणे
२. तिरंगी पट्टया डोक्याला किंवा हाताला न बांधणे
३. देवतांचे विडंबन होऊ नये, यासाठी टी-शर्ट वर देवतांचे चित्र न छापणे
४. दुचाकी वाहनांवर कागदी किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज न लावणे, तसेच त्याचा अन्यत्रही वापर न करणे
५. मनमानी करून राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्यांना खडसवणे किंवा पोलीस ठाण्यात तक्रार देणे
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून खर्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा करा !
आज भारतावर चीन कधीही आक्रमण करील, अशी स्थिती आहे. असे असतांना देशातून चिनी वस्तूंना आपण हद्दपारच करायला हवे. आज भारतीय सैनिक प्राणपणाने सीमेवर लढत आहेत. यामुळेच आपण उत्सव साजरा करू शकत आहोत. मित्रांनो, प्रत्येक जण सीमेवर जाऊन लढू शकत नाही; मात्र राष्ट्राप्रतीचे कर्तव्य म्हणून पुढील गोष्टी कराच !
१. दहीहंडीच्या वेळी चिनी बनावटीच्या तोरणांवर बहिष्कार घालून झेंडूच्या फुलांचे तोरण लावून राष्ट्रनिष्ठा जपा !
२. रस्त्यात पडलेले ध्वज एकत्र करून जवळील शासकीय-प्रशासकीय कार्यालयात जमा करा !
३. सध्या देशाविषयी प्रेम नसलेले वन्दे मातरम् ला विरोध करत आहेत. दहीहंडीच्या उत्सवात वन्दे मातरम् आणि भारतमाता की जय या घोषणा आवर्जून द्या. संपूर्ण वन्दे मातरम् च्या गायनाचे आयोजन करा !
४. उत्सवाच्या ठिकाणी क्रांतीकारकांच्या जीवनपटाविषयी माहिती देणार्या फलकांच्या प्रदर्शनांचे आयोजन करा. असे फलक हिंदु जनजागृती समितीकडे विनामूल्य उपलब्ध आहेत !
५. संकुल (सोसायटी), मंडळे आणि चाळ येथील फलकांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाच्या सन्मानाविषयी प्रबोधन करा !
बांधवांनो, या सर्व कृती करणे हा देशसेवेतील खारीचा वाटाच आहे ! सर्वांनी देश माझा ! राष्ट्रध्वज माझा ! या भावनेने राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी पुढे आल्यास स्वातंत्र्यदिनाला खर्या अर्थाने राष्ट्रप्रेम जागृत झाले, असे म्हणता येईल !
हे श्रीकृष्णा, आम्हा सर्व युवकांचे, नागरिकांचे संघटन होऊन, सर्वांना राष्ट्रकार्यासाठी, मातृभूमीच्या रक्षणासाठी शक्ती मिळू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !
वाढवूया उत्सवाची शान ! करूया राष्ट्रध्वजाचा सन्मान !
भारतमाता की जय ! वन्दे मातरम् !
– श्री. सुमित सागवेकर, मुंबई
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात