कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीच प्रदूषणकारक ! – हरित लवादाचा निकाल
मुंबई : इको-फ्रेंडली म्हणून विकल्या जाणार्या कागदी लगद्याच्या मूर्ती या पर्यावरणाला घातक आहेत, हे मान्य करत शासनाच्या कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्याच्या निर्णयावर राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती आणली आहे. १० किलोच्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीमुळे १००० लिटर पाणी प्रदूषित होते, तसेच शासन कोणतेही संशोधन न करताच कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देत आहे, असेही हरित लवादाने मान्य केले. त्यामुळे प्रदूषणकारी कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणपूरक आहे, असे म्हणणे म्हणजे जनतेची फसवणूकच आहे. शासनाने या कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर त्वरित बंदी न घातल्यास त्याच्या विरोधात हरित लवादाच्या आदेशाचा अवमान केल्याविषयी याचिका प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हरित लवादाकडे याचिका प्रविष्ट करणारे हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीने विविध संशोधन संस्था आणि पर्यावरणतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून राष्ट्रीय हरित लवादाकडे एक याचिका प्रविष्ट केली होती. यावर निकाल देतांना न्यायमूर्ती यू.डी. साळवी आणि तज्ञ सदस्य श्री. अजय देशपांडे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी कागदी लगद्याच्या मूर्ती करण्याच्या शासननिर्णयावर स्थगिती आणली आहे.
शाडू मातीची श्री गणेशमूर्ती जलप्रदूषण रोखणारी आणि अध्यात्मशास्त्रानुसार आहे ! – शिवाजी वटकर
शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली मूर्ती बनवण्यास मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे. कृत्रिम हौद, अमोनियम नायट्रेटचा वापर करून विसर्जन, मूर्तीदान आदी अघोरी पद्धती बंद करून त्यासाठी वापरला जाणारा निधी या मूर्तीकारांना अनुदान म्हणून द्यावा, तसेच समाजाला शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली श्री गणेशमूर्ती स्थापन करावी, असे आवाहन करावे. असे केल्यास जलप्रदूषणाचा प्रश्नच येणार नाही आणि अशी मूर्ती अध्यात्मशास्त्रानुसार असल्यामुळे धर्मपालनही होईल. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही नुकतेच मन की बातद्वारेही शाडू मातीच्या मूर्ती बसवण्याचे आवाहन केले आहे. त्याला तरी राज्यशासन आणि पालिका प्रशासन प्रतिसाद देईल का, असा प्रश्न श्री. शिवाजी वटकर यांनी या वेळी उपस्थित केला.
धर्मविरोधी उपक्रम बंद न केल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटना आंदोलन छेडतील ! – अभय वर्तक
गणेशोत्सवात जलप्रदूषणाची आठवण होणार्या प्रशासनाला खरोखरंच जलप्रदूषण रोखायचे असेल, तर सर्वप्रथम राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्याकडून प्रतिदिन २ अब्ज ५७ कोटी १७ लाख लिटर एवढे अतिदूषित सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता नद्या, तलाव आदी जलक्षेत्रांमध्ये सोडले जाते, ते प्रथम प्रक्रिया करून सोडण्यास प्रारंभ करावा. ते न करता श्री गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याची बांग देत प्रशासन कृत्रिम हौदातील मूर्ती दगडांच्या खाणी, पडक्या विहिरी, खड्डे आदी बुजवण्यासाठी वापरतात, तसेच कचरा भरण्याच्या गाडीतून या मूर्तींची वाहतूक करून श्री गणेशाची घोर विटंबना केली जाते. हे संतापजनक असून प्रशासनाने हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळणे थांबवावे. हे धर्मविरोधी उपक्रम बंद न केल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटना तीव्र आंदोलन छेडतील, अशी चेतावणी श्री. अभय वर्तक यांनी या वेळी दिली.
कोणतेही संशोधन न करताच कागदी लगद्याच्या मूर्ती इको फ्रेंडली ठरवणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुरोगामी संस्था ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
काही पुरोगामी संघटनांनी सांडपाण्यामुळे वर्षभर होत असलेल्या नद्यांच्या भयंकर प्रदूषणाकडे डोळेझाक करून केवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते, असा धादांत खोटा प्रचार राज्यभरात चालवला. परिणामी शासनाने याविषयी ३ मे २०११ या दिवशी शासकीय आदेश काढला, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही कोणताही अभ्यास न करताच आंधळेपणाने कागदी लगद्यापासून बनवलेली इको फ्रेंडली गणेशमूर्ती घ्या, असे आवाहन केले. याविषयी हिंदु जनजागृती समितीने प्रत्यक्षात कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती घेऊन काही प्रतिष्ठित संशोधन संस्थांकडून लगद्याच्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्यावर होणारा परिणाम अभ्यासून त्याचा अहवाल घेतला. त्यातून लक्षात आले की, या कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीच प्रदूषणकारक आहेत, तसेच या पुरोगामी संस्था आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ खोटी माहिती देऊन जनतेला मूर्ख बनवत आहे. त्यामुळे या विरोधात हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका प्रविष्ट केली. हरित लवादाच्या निकालातूनही कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे प्रदूषण होते, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने आता त्वरित हरित लवादाच्या या आदेशाचे पालन करावे आणि कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती या पर्यावरणाची हानी करणार्या आहेत, त्यांची विक्री आणि प्रचार करणे बेकायदेशीर आहे, याविषयी समाजात जागृती करावी, असे आवाहन या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.
कागदी लगद्याच्या संदर्भातील संशोधनातील निष्कर्ष
सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या एन्व्हॉरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन आणि मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्था(Institute Of Chemical Technology, Matunga, Mumbai) यांच्या संशोधनात पुढील निरीक्षणे आली.
१. कागदी लगद्याच्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅडमियम, टायटॅनिअम ऑक्साईड असे अनेक विषारी धातू त्यात मिळून आले.
२. डॉ. सुब्बाराव यांच्या संशोधनात कागद विरघळवलेल्या या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा शून्यावर आल्याचे स्पष्ट झाले; जे अत्यंत घातक आहे.
३. कागदाचा लगदा पाण्यात गेल्यावर त्याचे बारीक कण होतात. त्यामुळे माशांच्या श्वसनप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
४. कागदांवर छपाईसाठी वापरली जाणारी शाई पर्यावरणपूरक असेलच असे नाही.
क्षणचित्रे :
१. अनेक पत्रकारांनी या वेळी कागदी लगद्याच्या गणेशमूर्तीचे दुष्परिणाम, तसेच गणेशोत्सव आणि हिंदूंचे इतर सण याविरोधात शासनाकडून घालण्यात येणारी विविध बंधने याविषयी समितीची भूमिका जिज्ञासेने जाणून घेतली.
२. झी २४ तास, न्यूज ९ , जनादेश आदी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी वक्त्यांच्या मुलाखती घेतल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात