-
हिंदु जनजागृती समितीचे पुणे पालिका प्रशासनाला आवाहन
-
महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन सादर
-
शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचे महापौरांचेआश्वासन; मात्र कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेट या अशास्त्रीय पर्यायांचा वापर करण्यावर ठाम
पुणे : गणेशोत्सवामध्ये शिरलेले अपप्रकार दूर व्हावेत आणि उत्सव धर्मशास्त्रीयदृष्ट्या साजरा व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवली जाते. पालिका प्रशासनानेही त्यासाठी सहकार्य करून कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेटचा वापर या विसर्जनाच्या अशास्त्रीय प्रकारांना फाटा देऊन श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने ५ ऑगस्ट या दिवशी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेतली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, श्री. चैतन्य तागडे, डॉ. ज्योती काळे यांच्यासह समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर हेही उपस्थित होते. या वेळी महापौरांनी शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्तींना पालिका स्तरावर प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले; मात्र कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेट या अशास्त्रीय उपक्रमांचे समर्थनच केले. (कथित पर्यावरणवाद्यांच्या अवैज्ञानिक प्रचाराला बळी न पडता पालिका प्रशासनाने शास्त्र आणि विज्ञान समजून घेऊन योग्य निर्णय घ्यावेत, अशी गणेशभक्तांची अपेक्षा आहे. – संपादक)
समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी हौदातील श्री गणेशमूर्ती ट्रकमधून नेतांना, तसेच त्या विसर्जित करतांना त्यांनी अवहेलना होते. श्री गणेशमूर्तींचे अवयव भंग पावून त्यांची विटंबना होते, याकडे महापौरांचे लक्ष वेधले. त्या वेळी सौ. मुक्ता टिळक यांनी हौदातील श्री गणेशमूर्तींची विटंबना होणार नाही, यासाठी काळजी घेऊ, असे आश्वासन दिले.
शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे नदीतील गाळ वाढतो ?
कृत्रिम हौदांच्या संकल्पनेचे तोटे सांगूनही महापौर मुक्ता टिळक कृत्रिम हौदांच्या वापराविषयी ठाम होत्या. उलट शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्तींचेही कृत्रिम हौदातच विसर्जन करायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे नदीमध्ये गाळ वाढतो, असा तर्क त्यांनी सांगितला. (निसर्गनिर्मित घटकांमुळे प्रदूषण होत नाही. श्री गणेशाच्या उत्सवात तरी कुठल्याही शास्त्रीय आधाराविना मत बनवण्याचा अतार्किक प्रयत्न शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर होऊ नये, अशी अपेक्षा आहे. एरव्ही कारखान्यांतील रसायनयुक्त पाणी, मैलापाणी प्रतिदिन लक्षावधी लीटर प्रमाणात नदीत मिसळले जाते. त्याविरुद्ध चकार शब्द न काढता केवळ गणेशोत्सवाच्या वेळी जलप्रदूषणाचा बागुलबुवा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना गणेशभक्तांनी बळी पडू नये ! – संपादक) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मात्र गणेशभक्तांच्या सहकार्याने गणेशोत्सवाचे आणि विसर्जनाचे धर्मशास्त्र भाविकांना अवगत करण्याची प्रबोधन मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात