- शासनाला अडचणीत आणण्याचे ब्राह्मणद्वेषी पुरोगाम्यांचे हे षड्यंत्रच आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?
- उत्सव कुणी चालू केला यापेक्षा लोकमान्य टिळकांनी धार्मिक उत्सव खर्या अर्थाने सार्वजनिक करून त्या माध्यमातून निर्माण झालेल्या हिंदूसंघटनाने इंग्रज सरकारविषयी असंतोष निर्माण केला, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे टिळकांचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून त्यांचे छायाचित्र तिथे ठेवण्याचा ठामपणा शासनाने दाखवायला पाहिजे होता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : पुणे महापालिका आणि राज्य सरकार यंदाचा गणेशोत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करणार आहेत. यास भाऊ रंगारी मित्रमंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ भाऊ रंगारी यांनी केला असल्याचे सांगत ‘लोकमान्य टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक होत’, या आतापर्यंत शिकवल्या जाणार्या इतिहासाला आक्षेप घेतला. या संदर्भात ठोस भूमिका न घेता पुणे महापालिकेने लोकमान्य टिळक यांचे छायाचित्र गणेशोत्सवाच्या बोधचिन्हात घेण्याचे टाळले. १२ ऑगस्ट या दिवशी शनिवारवाडा येथे यंदाच्या ऐतिहासिक उत्सवाचे बोधचिन्ह, संकेतस्थळ, ध्वज, भ्रमणभाष अॅप यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या बोधचिन्हामध्ये लोकमान्य टिळक यांचे छायाचित्र अथवा नाव नाही.
महापालिकेच्या वतीने आधी बनवलेल्या बोधचित्रामध्ये लोकमान्य टिळक यांचे छायाचित्र असल्याचे सांगितले जात आहे. भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाच्या दबावामुळेच, तसेच या प्रकरणी ठोस भूमिका न घेतल्यानेच हे छायाचित्र काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र ‘‘बोधचिन्हामध्ये प्रारंभीपासूनच लोकमान्य टिळक यांची प्रतिमा नव्हती. बोधचिन्ह हे छोटे असते. त्यात कुणाचीही प्रतिमा घेणे शक्य नसते. त्यामुळे ती काढून टाकण्याचा प्रश्नच नाही. महापालिकेच्या स्वागत कमानींवर, तसेच अन्य ठिकाणी लोकमान्य टिळक यांचे छायाचित्र असणारच आहे’’, अशी भूमिका मांडली आहे.
लोकमान्य टिळक यांची प्रतिमा बोधचिन्हातून काढल्याप्रकरणी पालिका प्रशासनावर टीका होत होती. म्हणून कि काय या कार्यक्रमात व्यासपिठावर लावण्यात आलेल्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे छायाचित्र होते, तसेच व्यासपिठावर श्री गणेश, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांनी ‘शुभंकर अॅप’ या गणेशोत्सवाची प्रसिद्धी करणार्या अॅपचे उद्घाटनही या वेळी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात