सांगली : हिंदुत्वनिष्ठांवर दाखल झालेल्या खटल्यांच्या संदर्भात त्यांच्या बाजूने खटला लढवून त्यांना न्याय मिळवून देणारे सांगली येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता समीर पटवर्धन यांना स्वातंत्र्यवीर सावरकरभक्तांकडून नुकतेच एक सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. हे सन्मानपत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित ‘तेजोमय तेजोनिधी’ या कार्यक्रमात प्रसिद्धी अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते भावे नाट्यमंदिर येथे प्रदान करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने स्वातंत्र्यवीर सावरकरभक्त उपस्थित होते.
सन्मानपत्रातील लिखाण
‘आजपर्यंत २ तपांहून अधिक काळ फौजदारी न्यायालयात विधीज्ञ म्हणून सांगली येथे आणि अन्य ठिकाणी कार्यरत आहात. या कालावधीत आपण प्रखर राष्ट्रभक्तांवर घालण्यात आलेल्या खटल्यात अत्यंत मनापासून काम पाहिले. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना कार्य पुढे चालू ठेवण्यास बळ प्राप्त झाले. सांगली जिल्हा अधिवक्ता परिषदेवर अध्यक्ष या नात्याने आपण उल्लेखनीय कार्य करीत आहात. आपल्या आजोबांनी प्रत्यक्ष स्वा. सावरकर यांच्या संदर्भात झालेल्या खटल्यात त्यांचे वकील म्हणून काम पाहिले होते. तोच वारसा तुम्ही चालवून हिंदु समाज संघटकांना मोलाचा आधार देत आहात. त्याविषयी सावरकरभक्तांच्या वतीने हे सन्मानपत्र आपणास देण्यात येत आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात