Menu Close

. . . ही तर हिंदू जीवनपद्धतीचीच देणगी !

राष्ट्रीयता आणि नागरिकता या दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी दोन्हींचा अर्थ एकच होतो. मात्र राष्ट्रीयता ही जन्माने मिळते तर नागरिकता एक राजकीय व्यवस्था आहे, जी काळ,वेळ व स्थानानुसार बदलत राहते. एखाद्या व्यक्तीचे पूर्वज अनेक शतके ज्या एकाच भूप्रांतात, देशात जन्माला आले, ती त्या व्यक्तीची राष्ट्रीयता होय. मात्र एखाद्या देशात बराच काळ व्यापार उदीम केला व तेथील सोयी-सवलतींचा लाभ घेतला त्यांच्यासाठी त्या देशात राहणे ही त्यांची नागरिकता असते. राष्ट्रीयता कायमस्वरूपी असते, वंशपरंपरेने चालत आलेली असते तर नागरिकता ही तात्पुरती असते. राष्ट्रीयता कुणी हिसकावू शकत नाही, तिचा ह्रास ही होत नाही. या परिभाषेनुसार हिंदुस्थानात राहणारा कोणत्याही जातीधर्माचा का असेना हिंदूच आहे.

हिंदूंशिवाय इतर धर्माचे लोक स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला तयार नसतात. वास्तवात हिंदू या शब्दाचा उपयोग नागरिकता किंवा राष्ट्रीयता स्पष्ट करण्यासाठी होत असेल तर त्यांनी आक्षेप घेण्याचे कारण काय ? जन्मजन्मांतरापासून त्यांची मूळ ओळख हिंदू अशीच होती तर आता हिंदू हा शब्द त्यांनी झटकून का टाकावा ? असे दिसून येते की, स्वतःला हिंदू म्हणवून घेतल्याने त्यांची इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी वगैरे म्हणून जी एक ओळख आहे ती संकटात पडेल. त्यामुळे ते स्वतःला हिंदी किंवा हिंदुस्थानी तर म्हणवून घेतात; परंतु हिंदू मात्र नाही. आपली घृणा लपवण्यासाठी ते स्वतःला हिंदुस्थानी, हिंदी किंवा हिंदुस्थानीय असल्याचे सांगतात. ज्या हिंदू संस्काराचा लाभ हवा त्याचा वापर करायची वेळ आली की मात्र हजारो कारणे सांगितली जातात. ही मानसिकता अभ्यासाचा विषय आहे. सर्वच असे करतात असेही नाही. जगभर असे असंख्य लोक आहेत जे स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास लाज बाळगत नाहीत. इस्त्रायल याचे उत्तम आणि जिवंत उदाहरण आहे. तेथे शेकडो वर्षांपासून राहात असलेले लोक आजही आपण हिंदू यहुदी आहोत असे सांगतात. इस्त्रायलच्या हिंदूला आपण यहुदी हिंदू असल्याचे सांगता येत असेल तर एखाद्या मुस्लिमास हिंदू मुस्लिम किंवा एखाद्या ख्रिश्चनास हिंदू ख्रिश्चन असल्याचे का सांगता येऊ नये ?

इस्त्रायलनिवासी डॉ. यशवंत पाठक यांनी या संदर्भातील आपला एक गमतीदार अनुभव नुकताच पत्रकारांपुढे मांडला आहे. ते लिहितात…… ‘काही दिवसांपूर्वी इस्त्रायलच्या स्वातंत्र्यदिन समारंभात सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली. तेथे मी सांगितले की, मी हिंदू आहे आणि हिंदुस्थानातून आलेलो आहे. तेव्हा तेथील रहिवाशांनी माझ्याशी, माझ्या पत्नीशी अतिशय जिव्हाळ्याने आणि आपुलकीने भावविभोर होत संवाद साधला. आम्ही त्यांच्यात आहोत याचा त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी आम्हाला मिठाई दिली आणि मुलांसाठी खेळणीही दिली. आमच्यासोबत त्यांनी छायाचित्रेही काढली. एवढेच नव्हे तर ते असे ही म्हणाले की, आम्ही हिंदुस्थान, हिंदू आणि हिंदू दर्शन यांचा फार सन्मान करतो. ते म्हणतात की, जगात तुमचा एक हिंदुस्थान असा देश आहे, जेथे आम्हाला कधीही त्रास झालेला नाही. वेळ आल्यास आम्हाला या देशाने मनापासून आश्रयही दिला. त्यामुळे आमच्या मनात हिंदुस्थानबद्दल मोठा सन्मान आहे.

डॉ. यशवंत पाठक जेरुसलेमहून लिहितात, त्यांचे बेंजामीन नामक यहुदी नागरिक मित्र असे म्हणतात की, ‘हिंदू हा काही धर्म नाही, ती एक जीवनपद्धत आहे. त्यानुसार प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे. सर्वच मार्गांनी ईश्वर प्राप्त केला जाऊ शकतो, अशी हिंदू जीवनपद्धतीत धारणा आहे, त्यामुळेच मी स्वतःला हिंदू यहुदी असल्याचे मानतो.’

पाठक म्हणतात, याच काळात माझा एका अमेरिकन व्यक्तीशी परिचय झाला. त्यांचे नाव मार्क स्क्वायर. त्यांनी मला विचारले, तुम्हाला हिंदुस्थानी संगीत आवडते का ? मी म्हणालो, हिंदुस्थानी संगीतावर तर मी माझा जीव ओवाळून टाकतो. त्यांनी मला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. मी तेथे गेलो. मार्क यांच्या घरी हिंदुस्थानी संगीताचे फार मोठे भांडारच आढळून आले. आसावरी, दरबारी, कानडा आदी रागांवर आधारित हिंदुस्थानी संगीताच्या शेकडो सिडीज् तेथे होत्या. एवढा मोठा संग्रह असेल अशी मी कल्पनाच केलेली नव्हती. आमची हतप्रभ अवस्था पाहून त्यांना हसू आले.

मार्क म्हणाले, काही वर्षांपूर्वी जेव्हा मी खूप निराश झालो, आत्महत्येसाठी घराबाहेर पडलो, चालत असताना माझ्या कानांना सतारीची धून ऐकू आली. तिने मला मोहून घेतले. जशी जशी सतारीची धून ऐकू येऊ लागली, मी खिळून गेलो. त्या स्वरांनी जणू काही माझा ताबाच घेतला. मनातून आत्महत्येचा विचार केव्हाच निघून गेला. माझ्यात जगण्याचे साहस आले, मी दृढनिश्चय केला की मला आता जगायचेय. परिस्थितीशी सामना करायचा. तेव्हापासून मी केवळ हिंदुस्थानी संगीताचा भक्त आहे. मला हिंदुस्थानी संगीत कळते याचा मोठा अभिमान आहे. ज्याला हिंदुस्थानी संगीत कळत नाही त्याने जगच काय पाहिले ? मी तर हिंदुस्थानी संगीतासाठी पूर्ण समर्पितच झालेलो आहे.

हिंदू जीवनपद्धतीतील या विशालतेमुळेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरून नुकतेच निवृत्त झालेल्या ओबामांनी म्हटले की, येत्या काळात अमेरिकेत वसलेल्यांपैकी कुणी राष्ट्रपती बनू शकत असेल तर ती हिंदुस्थानात जन्माला आलेली व्यक्तीच असेल ! अमेरिकेत प्रतिदिन हिंदुस्थानी व्यक्तींची संख्या वाढतच चालली आहे. अमेरिकेतील हिंदुस्थानीनी बुद्धीच्या जोरावर महाशक्तीचे मन जिंकले आहे. अमेरिकेत संपूर्ण जगभरातून लोक आलेले आहेत. पण आपल्या मानसिक बळाच्या जोरावर अमेरिकेसारख्या महाशक्तीला आपल्या मुठीत घेतले ते केवळ हिंदुस्थानींनीच ! त्यामुळेच कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेत महत्त्व आहे ते हिंदुस्थानींचेच. हिंदुस्थानींची कार्यक्षमता, सेवाभाव, स्वभाव आणि अमेरिकेसाठी हिंदुस्थानींच्या मनात असलेली सन्मानाची भावना यामुळे हे शक्य झाले आहे. अमेरिकेप्रति असलेली हिंदुस्थानींच्या राष्ट्रभावनेमुळे तेथील जनता प्रभावित असते. केवळ अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण विश्व हिंदुस्थानींना मानते. स्वभावानुसार ते ज्या देशात जातात तेथील होऊन जातात. गेल्या पाचशे वर्षांत अमेरिकेत अशी एकही घटना घडलेली नाही ज्यामुळे तेथील जनतेला किंवा सरकारला काही त्रास झाला असेल. त्यामुळेच त्यांना आज ना उद्या पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही ज्याचा उल्लेख ओबामा यांनी केला आहे.

 

स्त्रोत : सामना

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *