हिंदु जनजागृती समितीचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारतीय निवडणूक आयोग यांना प्रत्युत्तर !
पणजी : पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठीची पोटनिवडणूक २३ ऑगस्ट या दिवशी घेतल्यास त्याचा मतदानावर विपरीत परिणाम होणार आहे. पोटनिवडणुकीमध्ये मतदारांचा सहभाग अधिकाधिक होण्यासाठी ही पोटनिवडणूक गणेशोत्सव काळात न घेता ती अन्य कालावधीत घ्यावी. आयोगाचा निर्णय अलोकशाही असून आयोगाला हिंदूंच्या भावना समजून घेण्यात अपयश आले आहे, असे प्रत्युत्तर एका पत्राद्वारे हिंदु जनजागृती समितीने गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या उत्तरावर १४ ऑगस्ट या दिवशी दिले आहे. याची प्रत देहली येथे भारतीय निवडणूक आयोगालाही पाठवण्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समितीने ‘गोव्यातील पोटनिवडणुकीचा दिनांक पालटावा’, अशी मागणी २ ऑगस्ट या दिवशी मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे केली होती. मुख्य निवडणूक अधिकार्यांनी हिंदु जनजागृती समितीची ही मागणी धुडकावून लावतांना गणेशोत्सवामुळे पोटनिवडणुकीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे समितीला कळवले होते. या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक गणेशोत्सव काळात न घेण्याची मागणी करण्यामागील भूमिका स्पष्ट करणारे एक पत्र मुख्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे.
या पत्रात म्हटले आहे की,
१. ‘पोटनिवडणूक गणेशोत्सव काळात न घेण्याची मागणी धुडकावणारे निवडणूक कार्यालय हिंदूंच्या भावना समजून घेण्यास असमर्थ ठरले आहे. वास्तविक पोटनिवडणुकीचे वेळापत्रक घोषित करण्यापूर्वी राज्यातील धार्मिक उत्सवांचा विचार करणे आवश्यक होते.
२. श्री गणेशचतुर्थी जरी २५ ऑगस्ट या दिवशी असली, तरी हा उत्सव त्याआधीपासून प्रारंभ होतो. त्याची पूर्वतयारी ८ ते १० दिवस आधीच चालू होते. सध्या हिंदूंसमोर पोटनिवडणुकीत सहभागी होणे किंवा गणेशोत्सवात सहभागी होणे यांपैकी एकच पर्याय रहातो. पोटनिवडणूक गणेशोत्सव काळात घेण्याच्या निर्णयाचा हिंदु मतदारांवर विपरीत परिणाम होणार असल्याने हा निर्णय लोकशाहीविरोधी आहे.
३. गोव्यातील निवडणूक कार्यालय गणेशोत्सवाचे महत्त्व भारतीय निवडणूक आयोगाला पटवून देण्यास असमर्थ ठरले आहे. तसेच गणेशोत्सव काळात पोटनिवडणूक न घेण्याची विविध संघटनांची मागणी गांभीर्याने भारतीय निवडणूक आयोगाकडे मांडण्यात आली आहे का ? याविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
४. निवडणूक आयोगाने ख्रिस्ती समाजाच्या भावना लक्षात घेऊन वर्ष २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दिनांकात पालट केला होता. त्या वेळी उत्सवाचा दिवस आणि निवडणुकीचा दिवस हे निरनिराळे असूनही निवडणुकीच्या दिनांकात पालट करण्यात आला होता.
५. यावरून निवडणूक आयोग हिंदूंच्या भावनांना अनुसरून उदासीन असल्याचे स्पष्ट होते. श्री गणेशचतुर्थीच्या काळात निवडणुकीचे आयोजन केल्याने पोटनिवडणुकीचा निकाल योग्य लागेल, असे म्हणता येणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात