ज्येष्ठ फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांना ‘साहस पुरस्कार’ प्रदान
जे एका विदेशी पत्रकाराला जाणवते, ते हिंदू आणि सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना का वाटत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नायक नसून ते संपूर्ण जगाचे महानायक आहेत. ते एक महान योद्धा, आध्यात्मिक आणि दूरदृष्टी असणारे होते. त्यांनी सर्व हिंदूंचे संघटन केले, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे; पण आज हिंदूच हिंदूंचे वैरी झाले आहेत. प्रत्येक जण स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झाला आहे. स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी लढण्यास तो सिद्ध आहे; पण समाजासाठी नाही. मानसिक स्तरावरील संघर्ष करण्याची त्यांची सिद्धता नाही. आज पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत ? त्यांची वीरश्री, तसेच स्वधर्म आणि स्वभाषा यांचा अभिमान कुठे आहे ? एकेकाळी संस्कृत ही राष्ट्रभाषा होऊ शकली असती; पण आता पुष्कळ विलंब झाला आहे. असाच बिलंब होण्यापूर्वी उठा, जागे व्हा ! तुमचा धर्म आणि संस्कृती धोक्यात आहे, त्याचे रक्षण करा. आज मी बाहेरून येऊन तुम्हाला सांगत आहे; म्हणून सर्वजण ऐकत आहात; परंतु तुम्ही जागृत होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेले आचरणात आणून त्यांची शक्ती तुमच्यात जागवून लढायला सिद्ध व्हा, असे आवाहनपर प्रतिपादन ज्येष्ठ फ्रेंच पत्रकार श्री. फ्रान्सुआ गोतिए यांनी केले.
सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने प्रतिवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जगप्रसिद्ध बोस्टन खाडीतील उडीच्या निमित्ताने प्रदान करण्यात येणारा ‘साहस पुरस्कार’ यंदाच्या वर्षी फ्रान्सुआ गोतिए यांना राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे यांच्या हस्ते १२ ऑगस्टला देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि २१ सहस्र रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मानपत्राचे वाचन श्री. संजय वैशंपायन यांनी केले. या सत्काराला उत्तर देतांना श्री. गोतिए बोलत होते.
श्री. गोतिए म्हणाले की,
१. हिंदूंना त्यांच्या संस्कृतीचे महत्त्व ठाऊक नाही. मी जेव्हा अरविंद आश्रमात आलो, तेव्हा या संस्कृतीने भारावून गेलो आणि इथेच थांबलो; परंतु आज ही संस्कृती नष्ट होत आहे, याची जाणीव येथील हिंदूंना नाही.
२. येथील लोकांना गीता, पुराणे, उपनिषदे, कालिदास यांची माहिती नाही. आज देशातील मुलांना त्यांचा खरा इतिहास शिकवला जात नाही. ब्रिटिशांनी लिहून ठेवलेला इतिहास किंवा मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी लिहिलेला इतिहास शिकवला जातो. (शासनाने हे सत्य जाणून भारताचा गौरवशाली इतिहास समाजासमोर आणावा ! – संपादक)
३. आज प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीला त्यांच्या मुलांनी अभियंता, डॉक्टर होऊन अमेरिकेत जायला हवे, असे वाटते; याउलट परकियांना भारतीय संस्कृतीचे आकर्षण वाटत आहे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करणारी, ‘बॉलिवूड’च्या आहारी गेलेली, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता यांच्या गाळात रुतलेली आजची पिढी पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना काय वाटेल? ‘याचसाठी मी एवढा आटापिटा केला का ?’, असे त्यांना वाटल्याविना निश्चितच रहाणार नाही.
या वेळी श्री. चारुदत्त आफळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील समान वैशिष्ट्यांच्या सूत्रांवर मार्गदर्शन केले. त्याच समवेत श्री. फ्रान्सुआ गोतिए यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना श्री. आफळे म्हणाले, ‘‘एक परकीय व्यक्ती भारतात येऊन इतके महान कार्य करते आणि हिंदूंना त्याची माहितीही नसते.’’
क्षणचित्रे
१. श्री. फ्रान्सुआ गोतिए यांना दिलेले सन्मानपत्र संस्कृतमधून होते.
२. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात