हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेला विक्रेत्यांचा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद
राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिकचे किंवा कागदी राष्ट्रध्वज न विकणार्या विक्रत्यांनी राष्ट्रभक्ती दर्शवल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! सर्वच ठिकाणच्या विक्रेत्यांनी सोलापूर येथील विक्रेत्यांकडून बोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संगदरी (तालुका दक्षिण सोलापूर) – येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे १५ ऑगस्ट या दिवशी गावात कोणीही प्लास्टिकचा किंवा कागदी राष्ट्रध्वज विकला नाही. परिणामी गावामध्ये एकही लहान राष्ट्रध्वज इतस्ततः पडलेला आढळून आला नाही. पर्यायाने राष्ट्रध्वज रस्त्यात पडून होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान टळला.
येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर प्रबोधन करण्यात आले होते. प्लास्टिकचे किंवा कागदी छोटे राष्ट्रध्वज विकत घेतल्यामुळे त्याचा वापर झाल्यावर ते रस्त्यावर पडलेले आढळतात आणि त्यांची विटंबना होते. यासाठी प्लास्टिकच्या किंवा कागदी राष्ट्रध्वजाची खरेदी किंवा विक्री करू नये, असा विषय मांडण्यात आला होता.
त्या वेळी २०० विद्यार्थ्यांसमवेत २५ ग्रामस्थ आणि शिक्षक उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि श्री. निंगु तुणतुणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात