अमरावती : येथे १५ ऑगस्टला सकाळी ७.३० ते १० यावेळेत राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवण्यात आली आणि क्रांतीकारकांच्या जीवनगाथेवरील प्रदर्शन भरवण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे आणि भगवे वादळ संघटनेचे श्री. अतुल खोंड यांच्या हस्ते भारतमातेच्या छायाचित्राचे पूजन करून करण्यात आले. येथील परिसरात शाळा आणि महाविद्यालये मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, फुगे, हाताचे बँड यांची विक्री होते. या वेळी धर्माभिमान्यांनी हे घेऊन जाणार्यांचे प्रबोधन केले आणि अशा प्रकारचे राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये घालण्यास सांगितले. बर्याच नागरिकांनी प्रतिसाद देत असे ध्वज स्वतःहून सन्मान पेटीत घातले. (कृतीशील नागरिकांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महेश लढके, श्री. करण धोटे यांनी कराटे, दंडसाखळी, लाठी-काठी यांची स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ओम झगडे, श्री. चैतन्य उपाध्याय यांसह २५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. १० वर्षीय विद्यार्थ्याने पुढाकार घेऊन लोकांचे प्रबोधन केले आणि राष्ट्रध्वज गोळा केले.
२. प्रथमच आलेल्या धर्माभिमान्यांनी उत्साहाने धर्मसेवा केली.
राष्ट्रध्वजाचा अवमान न रोखणारे पोलीस !
अशा पोलिसांवर शासन कठोर कारवाई करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
काही युवक अशोकचक्र नसलेला मोठ्या आकाराचा भारताचा ध्वज हातात घेऊन जात होते. त्यांना धर्माभिमान्यांनी अडवले आणि अशोकचक्र नसल्याने तो जमा करण्यास सांगितले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या ३ – ४ पोलिसांनी धर्माभिमान्यांना साहाय्य न करता ‘चौकात गर्दी करू नका. आम्हाला त्रास होतो’, असे म्हणून युवकांना पाठवून दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात