हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लिंगनूर दुमाला येथे उपसरपंचांना निवेदन दिले
लिंगनूर दुमाला (जिल्हा कोल्हापूर) : कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथे ‘श्री गणेशमूर्तींचे दान नको, तर धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन व्हावे’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. मंगल कुंभार यांना १४ ऑगस्टला देण्यात आले. या वेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसदस्य, ग्रामसेवक, धर्मप्रेमी सर्वश्री वसंत बागडे, सागर कामले, प्रमोद बागडे, सुरज बारड, दत्तात्रेय कुंभार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष सणगर, आदित्य शास्त्री उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागल येथे तहसीलदार यांना निवेदन
कागल (जिल्हा कोल्हापूर) : श्री गणेशमूर्तींचे दान नको, तर धर्मशास्त्राप्रमाणे विसर्जन व्हावे, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार श्री. किशोर घाटगे यांना १४ ऑगस्टला देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री प्रमोद आरेकर, रुद्रप्पा पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री किरण चव्हाण, दशरथ डोंगळे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष सणगर, आदित्य शास्त्री उपस्थित होते.
श्री गणेशमूर्तींचे नदी, तलावात विसर्जन केल्यानंतर जलप्रदूषण होत असल्याचा कांगावा विद्रोही, पुरोगामी आणि अंनिस या संघटना करतात; मात्र प्रत्यक्षात श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केल्यानंतर प्रदूषण होत नाही, तर वर्षभर नद्या आणि तलाव येथे कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी आणि गावांतील सांडपाणी सोडण्यात आल्याने जलप्रदूषण होते, असा पर्यावरण तज्ञांचा अहवाल आहे. यासाठी प्रशासनाने याविषयी योग्य ती पावले उचलून हिंदूंना त्यांच्या धर्मशास्त्रानुसारच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करू द्यावे. मूर्तीदान न करण्याविषयी जनतेमध्ये जागृती करावी आणि आपले कर्तव्य बजावावे, असे म्हणणे हिंदुत्वनिष्ठांनी श्री. घाटगे यांच्यासमोर मांडले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात