-
हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !
-
प्रवचनांमधून राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे आणि सुराज्य स्थापनेसाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन
मुंबई : ज्या वन्दे मातरम् गीतातून स्फूर्ती घेऊन क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली, प्रसंगी प्राणांचे बलीदान केले, ते वन्दे मातरम् गीत म्हणावे कि म्हणू नये यावर आज देशात दोन गट पडले आहेत. भारताच्या ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वन्दे मातरम्च्या स्मृतींना पुनश्च उजाळा देण्यात आला. समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत विविध मंडळांमध्ये जाऊन संपूर्ण वन्दे मातरम् गाऊन त्याचा अर्थ लोकांना समजावून सांगितला. राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे आवाहन करतांना क्रांतीकारकांच्या पराक्रमाचा तेजस्वी इतिहास कथन केला. या वेळी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी समितीच्या वतीने राबवण्यात येणार्या राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळीचे कौतुक करून समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
माझगाव
येथे समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत संपूर्ण गाण्याचे महत्त्व आणि या गीताचा भावार्थ सांगून उपस्थितांसमोर संपूर्ण वन्दे मातरम् गीत सादर केले. या वेळी शिवसेनेचे महापालिका सभागृह नेते श्री. यशवंत जाधव, गोविंदा पथकाचे प्रशिक्षक श्री. अरुण पाटील, मंडळाचे पदाधिकारी श्री. जगन्नाथ तळेकर आणि उपसचिव श्री. भारत पाटील उपस्थित होते. येथील माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोविंदा पथकाने वर्ष २००२ च्या प्रजासत्ताक दिनी देहलीतील राजपथावर संचलन केले होते.
भांडुप
येथे सामूहिक राष्ट्रगीत आणि संपूर्ण वन्दे मातरम् गीत झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मयूर सरवदे यांनी स्वराज्य आणि सुराज्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. क्रांतीकारकांच्या बलीदानातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी धर्मपालन करून शिवरायांचे मावळे बनण्याचे आणि सुराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. हिंदु धर्माचे महत्त्व जाणून घेण्यासाठी समितीच्या धर्मशिक्षणवर्गात आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होण्याविषयीही त्यांनी सांगितले. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन घाग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी ७० शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या महिला शाखा संघटक सौ. नेहा पाटकर यांनी समितीचे आभार मानून शिवसेना शाखेत नियमित येणार्या कार्यकर्त्यांसाठी धर्मशिक्षण वर्ग आणि महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी केली.
येथील ओम मित्र मंडळामध्येही समितीच्या वतीने संपूर्ण वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणण्यात आले. सनातन प्रभातचे वाचक श्री. महाजन यांनी येथे पुढाकार घेतला होता.
सह्याद्री नगर गणेशोत्सव मंडळात ध्वजारोहणानंतर संपूर्ण वन्दे मातरम् गीत सादर करण्यात आले. त्यानंतर समितीचे डॉ. मयूर सरवदे यांनी स्वराज्य आणि सुराज्य या विषयावर उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. सह्याद्री नगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश गावकर हे सलग ३ वर्षे समितीच्या कार्यकर्त्यांना ध्वजारोहणाच्या दिवशी वन्दे मातरम् गीत म्हणण्यासाठी आमंत्रित करतात.
अंधेरी
अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरातील रामदास गार्डन, मॉडेल टाऊन, वीरा देसाई, धाकूशेठ पाडा आणि साईबाबा मंदिर येथेही समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच संपूर्ण वन्दे मातरम् गीत सादर करण्यात आले. एकूण २७० धर्मप्रेमी नागरिकांनी याचा लाभ घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात