केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांवर निर्बंध घालणे, ही मोगलाई नव्हे का ? पोलिसांनी असेच आदेश अवैधरित्या मशिदींवरील भोंग्यांसंबंधी देऊन कायदेशीर कारवाई करून दाखवावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी ढोलपथकांनी २५ ढोल आणि ५ ताशे यांसह वादन करावे, तसेच एका मंडळाच्या मिरवणुकीत फक्त २ पथकांना सहभागी करून घ्यावे. ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित पथके आणि गणशोत्सव मंडळ यांवर कारवाई करण्यात येईल, अशा चेतावणीवजा सूचना पुणे पोलिसांनी दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ढोल-ताशा पथकांना वादक आणि वादकांच्या संख्येच्या मर्यादेसंबंधीही सूचना केल्या आहेत. शहरातील सर्वच गणेशोत्सव मंडळांना एकसारखेच नियम लावण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
१. प्रतिवर्षी मिरवणुकांमध्ये एका मंडळासमोर ३ आणि त्यापेक्षा अधिक ढोलपथके वादन करत असल्याने उशीर होतो अन् त्यामुळे मिरवणूक लांबते. यावर उपाययोजना म्हणून पोलिसांनी वरील निर्णय घेतला आहे.
२. यासंबंधी परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली म्हणाले की, शहरामध्ये सर्वत्र वरील सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांकडून ही संख्या ठरवून दिली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई करणार आहेत, यासाठी मंडळे आणि पोलीस यांनी खबरदारी घ्यावी.
पोलीस मशिदींना ‘एकच भोंगा आणि २ नमाज’ असा नियम लावतील का ? – हिंदु जनजागृती समिती
पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल पथकांची संख्या अधिक असल्याने विसर्जन मिरवणुकीला पुष्कळ अवधी लागतो, असे कारण देत पुणे पोलिसांनी सर्व गणेशोत्सव मंडळांसाठी हा ‘फतवा’ काढला आहे. वर्षातून एकदा येणार्या गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणाच्या नावाखाली, तसेच ‘विसर्जन मिरवणुकांना वेळ लागतो’, या कारणाखाली मिरवणुकांवर बंधने घालणारे पोलीस ३६५ दिवस मशिदींवरील भोंग्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी असे निर्बंध का घालत नाहीत ? सकाळी ६ वाजण्यापूर्वी होत असलेल्या कर्णकर्कश ‘अजान’वर कारवाई करण्याचे न्यायालयाने अनेकदा आदेश देऊनही पोलिसांनी त्यावर काय कारवाई केली आहे ? पोलीस मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करायला घाबरतात का ?
जर मंडळांना ‘२५ ढोल आणि ५ ताशे’ अशी मर्यादा घातली जाणार असेल, तर मशिदींवर ‘एकच भोंगा आणि दोनच नमाज’ असे निर्बंध पोलीस घालतील का, असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलिसांना केला आहे.
या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, गणेशोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध आहे. समिती गेली १५ वर्षे ‘गणेशोत्सवांत ‘डीजे’वर पूर्ण बंदी घालावी, मिरवणुकांत मद्यपान करून सहभागी होऊ नये, मंडपांत जुगार खेळू नये, श्री गणेशमूर्तीसमोर १० दिवस अश्लील गाणी लावू नयेत, हिडीस अंगविक्षेप करत नाचू नये’, आदींविषयी प्रबोधन करत आहे; मात्र आता उत्सवांतील पारंपरिक वाद्यांवरही निर्बंध आणले जाणार असतील, तर हिंदु उत्सवांवर केल्या जाणार्या धार्मिक पक्षपाताविषयी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रितपणे विरोध करतील. सर्व मंडळांना एक न्यायाची भाषा करणारे ‘धर्मनिरपेक्ष’ पोलीस सर्व धर्मांना एक न्याय कधी देतील ? रात्री १० वाजल्यानंतर सर्व गणेशोत्सव मंडळे ध्वनीक्षेपक बंद करून ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळतात, विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही रात्री १० नंतर सर्व मंडळे वाद्ये बंद करतात. याचा अर्थ हिंदू कायद्याचे पालनच करतात. सर्व मंडळांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहनही समिती करते; मात्र याचा अर्थ ‘हिंदूंना कायदा आणि मुसलमानांना फायदा’ ही काँग्रेसीवृत्तीची बंधने भाजप शासनाच्या काळातही हिंदूंवर लादण्यात येत असतील, तर त्याला वैध मार्गाने कडाडून विरोध केला जाईल. पुणे पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांनी या निर्बंधांवर पुनर्विचार करावा आणि सर्वांना समान न्याय द्यावा. कोणत्याही प्रकारचा धार्मिक पक्षपात आम्ही सहन करणार नाही, अशी चेतावणीही समितीने या पत्रकातून दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात