-
आरोपीला अटक !
-
ग्रामस्थांचा कडकडीत बंद !
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यामुळेच आज जन्महिंदूंकडून देवतांचे वारंवार विडंबन केले जात आहे ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिले जाईल. त्यामुळे कुणाच्याही मनात देवता, संत, राष्ट्रपुरुष आणि अन्य श्रद्धास्थानांचे विडंबन करण्याचा विचार येणार नाही ! -संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोल्हापूर : फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेशाचे सिगारेट ओढतांनाचे आणि अन्य अश्लील चित्रे ‘पोस्ट’ (प्रसारित) करून विडंबन केले होते, तसेच मराठा समाजाने काढलेल्या मोर्च्याविषयी जातीय तेढ निर्माण करणारा संदेश पसरवला होता. या प्रकरणी विजय कांबळे (वय ३३ वर्षे, रहाणार शिंगणापूर, तालुका करवीर) याच्या विरोधात येथील करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करून त्याला अटक करण्यात आली आहे. कांबळे याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शिंगणापूर येथील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. तसेच पोलीस अधीक्षक संजय मोहिते, करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांना निवेदन दिले.
या जातीयवादी संदेशामुळे शिंगणापूर येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. (श्री गणेशाच्या विडंबनाच्या विरोधात संघटित होणार्या शिंगणापूर येथील ग्रामस्थांचे अभिनंदन ! देवतांच्या विडंबनाच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने लढा देणे, ही काळाची आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘मराठा समाजाने काढलेल्या मोर्च्यामध्ये मुसलमान सहभागी झाले होते, मग मुसलमानांनी मोर्चा काढला, तर त्यात मराठा समाज सहभागी होणार का ?’ असा जातीय तेढ निर्माण करणारा संदेश प्रसारीत झाला होता.
याविषयी शिंगणापूर येथील ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की,
१. १५ ऑगस्टला शिंगणापूर येथे गावसभेत एका तरुणाने या आक्षेपार्ह संदेशाची झेरॉक्स गावसभेत दाखवली. त्या वेळी ग्रामस्थांनी या संदेशाविषयी विजय कांबळे याला क्षमा मागण्यास सांगितले; मात्र त्याने क्षमा न मागितल्याने ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कांबळे याला ग्रामसभेतून घरी पाठवले.
२. कांबळे याच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शिंगणापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी १७ ऑगस्टला १०० हून अधिक ग्रामस्थांनी करवीर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. कांबळे याने चालू केलेल्या साप्ताहिकाची नोंदणी आहे कि नाही, याची चौकशी करून आक्षेपार्ह लिखाणाविषयी कारवाई करावी, अशी मागणी केली.
३. विजय कांबळे यानेही उलट शिंगणापूर येथील ४ जणांच्याविरुद्ध जिवे मारण्याचा (अॅट्रासिटीचा) गुन्हा प्रविष्ट केला. या निषेधार्थ ग्रामस्थांनी करवीर पोलीस ठाणे आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर गावाच्या वतीने विजय कांबळे याच्यावर सायबर क्राईमखाली करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आणि ४ ग्रामस्थांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घेण्यात आले.
४. या घटनेविषयी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांना माहिती विचारली असता त्यांनी या घटनेविषयी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. (जातीय तेढ निर्माण होणारच नाही, यासाठी पोलीस कोणती दक्षता घेतात ? या घटनेविषयी शिंगणापूर येथील ग्रामस्थांनी जागृत आणि संघटित होऊन आवाज उठवल्यामुळे पोलिसांनी कांबळे याला अटक केली अन्यथा पोलिसांनी कांबळे हा ‘माथेफिरू अथवा मनोरुग्ण’ असा शिक्का मारून त्याला सोडून दिले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात