Menu Close

शासनाने हिंदूंच्या प्रथा-परंपरामध्ये हस्तक्षेप करू नये ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

श्री तुळजाभवानी मंदिरातील धर्मशास्त्रीय प्रथा-परंपरांची पायमल्ली रोखण्यासाठी आंदोलन !

तुळजापूर येथे आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

तुळजापूर : मंदिराच्या परंपरेनुसार भाविकांना सर्वकाळ श्रीशहाजीराजे महाद्वारातून प्रवेश द्यावा आणि शासनाच्या निष्क्रीयतेमुळे बंद असलेले भक्तनिवास तात्काळ खुले करण्यात यावेत, मंदिर समितीमध्ये धर्मशास्त्र अभ्यासक, धार्मिक प्रथा-परंपरा जपणारे, देवीभक्त आणि उपासना करणारे सदस्य नियुक्त करावेत, तसेच शासनाने हिंदूंच्या प्रथा-परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत त्यामुळे अशी मोगलाई खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी दिली. श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण कृती समितीच्या वतीने १९ ऑगस्ट या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरासमोरील पटांगणात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाच्या समारोपप्रसंगी येथील तहसीलदार श्री. दिनेश झांपले यांनी उपस्थित राहून निवेदन स्वीकारले. निवेदनावर १०० हून अधिक पुजारी आणि भाविकांच्या स्वक्षर्‍या होत्या.

या वेळी पाळीकर पुजारी संघटनेचे अध्यक्ष विपीन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेश चोपदार, भाजप युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत साळुंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष संदीप गंगणे, युवा सेनेचे शहराध्यक्ष सागर इंगळे, गोदावरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मयुर कदम, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज, युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी आदी मान्यवरांनी कृती समितीच्या कार्याला पाठिंबा दर्शवत आपले मनोगत व्यक्त केले.

१. यात्राकाळात मुख्य प्रवेशद्वारातून आल्यावर प्रथम कल्लोळ तीर्थ घेणे, त्यानंतर श्रीगणेशाचे दर्शन घेणे आणि नंतर श्री तुळजाभवानीचे दर्शन घेणे, असे धर्मशास्त्रीय संकेत आहेत. याद्वारे प्रथम देहशुद्धी आणि मनशुद्धी होते. नंतर देवतेच्या दर्शनाने भाविकांना शक्ती मिळते; पण दर्शनाचे मार्ग इतर द्वारांमधून केल्याने भाविक स्वयंभू कल्लोळ तीर्थ आणि श्रीगणेशाचे दर्शन न घेता मंदिरात दर्शनासाठी येतात. परिणामी ते या दोन्ही लाभांपासून वंचित रहातात. भाविकांना मिळणारा हा आध्यात्मिक लाभ प्रशासनाने हिरावून घेतला आहे. श्री तुळजाभवानी मंदिराच्या स्थापनेपासून आजपर्यंत परंपरेने महाद्वारातूनच प्रवेश दिला गेला आहे. आता मात्र सुरक्षेचे कारण देत यात्राकाळात महाद्वारातून प्रवेश बंद ठेवला जात आहे. नवरात्रकाळात महाद्वारातून दर्शन मार्ग बंद करून गैरसोयीचा आणि परंपरा तोडणारा मार्ग निवडला जात आहे.

२. पोलीस बूट घालून फिरतात. त्यामुळेही मंदिराचे पावित्र्य नष्ट होत आहे.

३. श्री तुळजाभवानी मंदिरातील ज्या पुजार्‍यांची पाळी असेल, त्यांनीच देवीचे सर्व विधी करायचे, अशी नोटीस दिली आहे. असे झाल्यास एकाच पुजार्‍याला १२ ते १५ घंटे आणि यात्राकाळात तर २४ घंटे गर्भगृहात रहावे लागेल. पुजार्‍यांशी संबंधित निर्णय घेतांना त्यांच्याशी चर्चा करून सारासार विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असतांना अशा प्रकारे निर्णय लादले जात आहेत.

आंदोलनस्थळी साध्या वेशातील एक पोलीस अधिकारी आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना विचारले की, भविष्यात काही अपप्रकार झाल्यास तुम्ही उत्तरदायी असणार का ? (भाविकांनी हेही करायचे, तर पोलीस काय करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *