हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कायदेशीर नोटीस !
अशी नोटीस द्यावी लागणे, हे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार यांना लज्जास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली आहे. याला अनुसरून कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करू, असे निवेदन १७ ऑगस्ट या दिवशी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयात सचिवांना देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर यांच्या वतीने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या विषयीची नोटीस मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयात दिली.
या याचिकेतून कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे पर्यावरणाची होणारी हानी संशोधन संस्था आणि पर्यावरण तज्ञ यांनी स्वतः चाचण्या करून सिद्ध केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले.
प्रदूषण रोखण्याचे दायित्व असतांनाही पुरोगामी संस्थांच्या नादी लागून कोणताही अभ्यास वा संशोधन न करताच कागदी लगद्याच्या मूर्तींना ‘इको-फ्रेंडली’ ठरवण्याचे कारस्थान ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि राज्याचा पर्यावरण विभाग यांनी केल्याचे न्यायालयाच्या निकालातून सिद्ध झाले. निकालानंतर १० मास होऊनही त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे होणार्या प्रदूषणाविषयी कोणतीही जागृती केली नाही. इतकेच नव्हे, तर यंदाच्या गणेशोत्सवाच्या पूर्वीही त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणे चालू केले आहे. त्यामुळे कागदाच्या लगद्याच्या मूर्तींवर त्वरित बंदी आणली नाही, तर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण विभाग यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार असल्याची चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली होती.
नवी मुंबई, उल्हासनगर आणि कल्याण येथेही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस
१८ ऑगस्ट या दिवशी नवी मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. भालचंद्र गायकवाड यांनी अधिवक्ता पूनम जाधव-हांडे यांच्याद्वारे नवी मुंबई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना नोटीस दिली. यासह कल्याण महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिका यांचे आयुक्त अन् महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय ठाकरे यांच्या वतीने अधिवक्ता विवेक भावे यांनी नोटीस दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात