‘येळकोट येळकोट जय मल्हार’
जेजुरी : महाराष्ट्राचे श्रध्दास्थान व अठरा पगड जातीचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेसाठी सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली. दुपारी एक वाजता सनई-चौघड्यांच्या निनादात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, असा जयघोष करत श्री खंडोबाची पालखी कर्हा स्नानासाठी निघाली. सायंकाळी पाच वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत कर्हा नदीवर पालखीतील खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्तींना विधीयुक्त स्नान घालण्यात आले. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ही भर सोमवती अमावस्या असल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
राज्याच्या काही भागात असलेला बैल पोळा, सोमवारचे उपास, दोन दिवस पडत असलेला पाऊस याचा यात्रेवर काही प्रमाणात परिणाम जाणवला. पण, तरी सुध्दा तीन लाखांपर्यंत भाविक जेजुरीत आले होते. राज्याच्या बहुतांशी भागामध्ये दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे येथे आलेल्या भाविकांच्या चेहर्यावर समाधान होते. खंडोबा देवाला जेथे स्नान घातले जाते, ते पात्र कोरडे ठणठणीत पडले होते. या परिसरात पाऊस झाला. मात्र नदीला अद्याप पाणी आलेले नसल्याने जेजुरी नगरपालिकेने या ठिकाणी टँकरच्या पाण्याची सोय केली होती.
सोमवारी खंडोबा गडामध्ये दुपारी १ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. मुख्य पेशवे इनामदार यांनी सुचना करताच मानकरी, खांदेकर्यांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली, पालखीत खंडोबा-म्हाळसादेवींच्या मुर्ती ठेऊन पालखी कर्हा स्नानासाठी निघाली. यावेळी भाविकांनी पिवळ्याधमक भंडार्याची मुक्त उधळण केली, भाविकांचा उत्साह मोठा होता. जेजुरीमध्ये आरोग्यास अपायकारक असणार्या भेसळयुक्त भंडार्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. या भंडार्याच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी भाजप आक्रमक आहे. शनिवारी अन्न व औषध प्रशासनाने येथील भंडार-खोबरे दुकानांची कडक तपासणी करुन भंडार्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. यामुळे आजच्या यात्रेत बनावट भंडार दिसून आला नाही. सायंकाळी पाच वाजता पवित्र कर्हा स्नान झाल्यावर रात्री पालखी पुन्हा खंडोबा गडावर आणण्यात आली. कडेपठारच्या डोंगरातही आज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भंडार-खोबरे, देवाच्या मुर्ती, कॅसेट, दिवटी-बुधली, फोटो आदी वस्तुनां चांगली मागणी होती.
संदर्भ : लोकसत्ता