Menu Close

देवस्थान समितीत घोटाळे करणार्‍या दोषींना पाठीशी घातले जाणार नाही – महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

मंदिर सरकारीकरणामुळेच घोटाळेबाजांना अभय मिळत आहेत. देवस्थान समितीमध्ये घोटाळे होऊ नयेत आणि घोटाळेबाजांवर कठोर कारवाई होणे, यासाठी मंदिरांचा कारभार भक्तांच्या स्वाधीन केला पाहिजे !

४७ वर्षांत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला १३९ कोटी ८७ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त

कोल्हापूर – पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळ्यांमधील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. या घोटाळ्याच्या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. देवस्थान समितीच्या वतीने विविध विकासकामे आणि पारदर्शी कारभार केला जाईल. १ वर्षात पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान हे आदर्श देवस्थान म्हणून गणले जाईल, अशा पद्धतीने आम्ही काम करू, असे प्रतिपादन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी २३ ऑगस्टला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. देवस्थान समितीला वर्ष १९६९-७० ते वर्ष २०१५-१६ या कालावधीत अधिकोष व्याजासह एकूण १३९ कोटी ८७ लक्ष ५० सहस्र ९३१ रुपये प्राप्त झाले आहेत.

या रकमेमधून मंदिराच्या संदर्भातील सर्व देयकांचा खर्च आणि दुष्काळग्रस्त निधी, सामाजिक साहाय्य इत्यादी कारणांसाठी रक्कम खर्च होऊन आज अखेर सदरच्या निधीची अधिकोषांमध्ये मुदत ठेवीत गुंतवणूक केली आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष सौ. वैशाली क्षीरसागर, सचिव श्री. विजय पोवार उपस्थित होते.

श्री. महेश जाधव पुढे म्हणाले की,

१. देवस्थान समितीच्या वतीने अन्नछत्र आणि भक्तनिवास उभे केले जाणार आहेत. मंदिरात कोणतेही आस्थापन आणि अधिकोष यांची जाहिरात केली जाणार नाही.

२. मंदिराच्या आवारात प्लास्टिक कोणी न वापरण्यासाठी दुकान मालकांना पत्र पाठवण्यात येईल. मंदिरात कागदी पिशव्यांचा वापर करण्यात येईल.

३. देवस्थान समितीच्या अनेक भूमी असून त्या सर्व भूमी परत मिळवण्याचे काम चालू केले आहे. भूमीचा अपवापर होऊ देणार नाही. दानपेटीत दागिने म्हणून बनावट बेनटेक्स टाकले जातात. हे बेनटेक्स आणि दागिने यांच्या वेगवेगळ्या नोंदी केल्या जातील. श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांची सोनाराकडून पडताळणी केली जाईल.

४. दुकानदारांनी हळद आणि कुंकू यांमध्ये रासायनिक पदार्थ वापरू नयेत, अशा सूचना त्यांना देण्यात येतील.

५. मंदिरात केवळ ५० ते ५५ सुरक्षारक्षक आहेत. मंदिरात अधिक सुरक्षारक्षक देण्याचा प्रयत्न राहील. मंदिराच्या विकासाच्या संदर्भात येत्या २-३ मासांत बैठक घेण्यात येईल.

६. देवस्थान समितीचा लोगो करण्याचे निश्‍चित केले आहे. हा लोगो बनवण्यासाठी प्रसिद्धी देऊन कलाकारांकडून स्पर्धात्मक नमूने घेऊन त्यामधून १ लोगो निवडण्यात येईल. उत्कृष्ट लोगो सिद्ध करणार्‍याला २१ सहस्र रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

७. देवस्थान भूमी खंडाची एप्रिल २०१७ ते आजअखेर एकूण ३७ लक्ष रुपयांची वसुली झाली आहे.

८. शिर्डी आणि सिद्धीविनायक मंदिरांच्या धर्तीवर निवासस्थान, अन्नछत्र, वाहनतळ, स्वच्छतागृह अशी विविध विकासात्मक कामे देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येतील.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *