सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांना हिरालाल तिवारी यांच्याकडून कायदेशीर नोटीस
हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !
पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली श्रीगणेश मूर्ती घ्या. या मूर्तीमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. यातून पर्यावरणरक्षण आणि धर्मशास्त्राचे पालन या दोन्ही गोष्टी साध्य होतील. कृत्रिम हौद, अमोनियम बायकार्बोनेेटमध्ये विसर्जन, मूर्तीदान आदी धर्मविरोधी पद्धतींवर बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
सोलापूर – राष्ट्रीय हरित लवादाच्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली. निकालानंतर १० मास होऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्याचा पर्यावरण विभाग यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे होणार्या प्रदूषणाविषयी कोणतीही जागृती केली नाही. इतकेच नव्हे, तर यंदाच्या गणेशोत्सवाच्या पूर्वीही त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणे चालू केले आहे. त्यामुळे कागदाच्या लगद्याच्या मूर्तींवर त्वरित बंदी आणली नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी श्री. हिरालाल तिवारी यांनी दिली आहे.
२१ ऑगस्ट २०१७ या दिवशी श्री. हिरालाल तिवारी यांच्या वतीने अधिवक्ता एल्.एन्. मारडकर यांनी सोलापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या नावे या प्रकरणाची नोटीस दिली आहे.
या नोटिसीतून आम्ही आपल्याला केवळ आपले कर्तव्य बजावण्याची मागणी जनहितार्थ करत आहोत. आपण हरित लवादच्या आदेशाला व्यापक प्रसिद्धी द्यावी. कागदी लगद्याच्या मूर्तीवर बंदी आणण्यासाठी पावले उचलावीत. या गोष्टी माझ्या पक्षकाराच्या वैयक्तिक हिताच्या नसून समाजहिताच्या आहेत.
या गोष्टी आपण वेळेत केल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनमानसात खालावलेली प्रतिमाच उंचावणार आहे. या उदात्त हेतूने खरे तर ही नोटीस आपणाला बजावण्यात येत असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात