इंदूर (मध्यप्रदेश) येथे राष्ट्ररक्षणामध्ये हिंदूंची भूमिका या विषयावर चर्चासत्र
इंदूर (मध्यप्रदेश) : धर्मनिरपेक्ष हा देशावरील सर्वांत मोठा डाग आहे. जेथे धर्म नाही, तेथे मानवता असेल का ? आमच्या धर्माने शास्त्रासह शस्त्राचाही स्वीकार केला आहे. जोपर्यंत शासन गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणार नाही, तोपर्यंत राष्ट्राचे रक्षण होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन मध्यभारत प्रतिनिधी सभेचे महामंत्री श्री. प्रकाश आर्य यांनी केले. येथील आर्य समाज महर्षि दयानंद गंज येेथे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.
ईश्वराच्या नियमाला समजून न घेता राष्ट्ररक्षण शक्य नाही ! – आंतरराष्ट्रीय वैदिक विद्वान आचार्य प्रभामित्र
खरा ईश्वरभक्तच राष्ट्रभक्त असू शकतो. जो तपस्वी आहे, तोच त्यागी, सदाचारी आणि ध्येय्यनिष्ठ असू शकतो. म्हणून ईश्वराच्या नियमाला समजून न घेता राष्ट्ररक्षण शक्य नाही. तपस्येसह आम्हाला वीरही बनले पाहिजे; कारण जो वीर आहे, तोच पृथ्वीवर राज्य करू शकतो.
राष्ट्र आणि धर्म यांच्याशी समर्पण असणार्यांचाच सन्मान होतो ! – विकास दवे, संपादक, देवपुत्र
जे राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित आहेत, त्यांचाच समाज आणि राष्ट्र सन्मान करतो, हे आज प्रतिष्ठेच्या मागे लागणार्या तरुणांनी समजून घेतले पाहिजे. अधिवक्ता, प्रशासकीय अधिकारी, तर अनेक झाले; पण स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षि अरविंद यांच्यासारखे राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित झालेल्या लोकांच्याच प्रतिमा घरोघरी लावल्या जातात, हे लक्षात घ्या.
हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध झाले पाहिजे ! – श्री. आनंद जाखोटिया
अवैदिक, सदोष आणि शोषण करणार्या व्यवस्थेत आपल्या संस्कृतीनुसार परिवर्तन आणल्याशिवाय राष्ट्ररक्षणाचा विचार होऊ शकत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी आम्हाला सनातन धर्मराज्याच्या स्थापना, म्हणजे हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध झाले पाहिजे. त्यामुळे भारताचेच नाही, तर जगाचेही रक्षण होऊन ते सुसंस्कृत होईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात