जळगाव : गोवंशहत्या बंदी कायदा लागू झाल्यावरही जिल्ह्यात अनेकदा गोमांसतस्करी आणि गोतस्करी करणारी वाहने पकडण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात चालणारी ही तस्करी जिल्ह्यात छुप्या पद्धतीने गोवंशियांची हत्या चालू असल्याचे दर्शवते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात येणार्या बकरी-ईदच्या दिवशी शहरातील काही संवेदनशील भागांमध्ये पोलीस निरीक्षण पथकांची नेमणूक करून गोवंशियांच्या हत्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, पुढील २ मास हे सणासुदीचे आहेत. या काळात मोठ्या संख्येने हिंदु भाविक रस्त्यावर सहकुटुंब उतरतात. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील उघड्यावर असणारी सर्व मांसविक्रीची दुकाने बंद करावीत, यापुढेही शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे यांच्या ५०० मीटर अंतरावरील परिसरात मांसविक्री करण्यावर बंदी आणावी, या परिसरातील दुकाने इतरत्र स्थानांतरित करावी, तसेच राज्यात लागू करण्यात आलेल्या गोवंशहत्या बंदी कायद्याची कडक कार्यवाही करण्यात यावी.
जिल्हाधिकार्यांच्या वतीने हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके यांनी स्वीकारले. या मागण्यांची नोंद घेत आम्ही महानगरपालिकेला योग्य त्या सूचना देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात