मोहल्ला समितीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन
मुंबई : इको फ्रेन्डलीच्या नावाने कागदाच्या लगद्यापासून सिद्ध करण्यात येणार्या श्री गणेशमूर्तीमुळे १०० किलो कागदामागे १० सहस्र लीटर पाणी प्रदूषित होते. शिवाय कागद पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतो, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला असतांना आपण कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा अट्टाहास का करतो ?, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर यांनी केले. परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या अधिपत्याखाली आयोजित केलेल्या गोरेगाव ते दहिसर या विभागातील गणेशोत्सव मंडळांच्या मोहल्ला समितीच्या बैठकीत ते बोलत होते. येथील ठाकूर वेल्फेअर हॉल, कांदिवली पूर्व येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव वास्तव आणि आदर्श ही ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
या वेळी पोलीस सुरक्षा विभागाच्या श्रीमती ठाकूर यांनी उत्सवांमध्ये कोणत्या प्रकारची दक्षता आणि काळजी घेतली पाहिजे या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच राधे डिझॅस्टर अॅन्ड एज्युकेशन फाऊंडेशनच्या डॉ. रिटा सावला यांनी रस्त्यात रुग्णवाहिकेला प्रथम जाण्यासाठी मार्ग का मोकळा करून दिला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. बैठकीत एका कार्यकर्त्याने आम्ही कागदी श्री गणेशमूर्ती बसवणार असे म्हणताच, डॉ. विनयकुमार राठोड यांनी राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय सांगून त्याचे प्रबोधन केले. या बैठकीत एकूण १५० विविध गणेशोत्सव मंडळांचे सुमारे १५० पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी हिंदु जनजागृती समितीचे आभार व्यक्त केले. समितीची ध्वनीचित्रफीत पाहिल्यावर दोन मंडळांचे पदाधिकारी प्रभावित होऊन त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून सांगितले की, आमच्या मंडळातील कार्यकर्त्यांनाही दाखवा. आम्ही आपणास सर्वतोपरी साहाय्य करू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात