- भाविकांचा धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याकडे कल
- कृत्रिम हौदाच्या अशास्त्रीय उपक्रमाकडे फिरवली पाठ
पुणे : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि भाविक यांनी विसर्जन घाटांवर प्रबोधन मोहीम राबवली. हिंदूंच्या सणांच्या वेळी कथित प्रदूषणाचा बागुलबुवा निर्माण करत धर्माचरणाच्या कृतींवर बंधने लादली जातात. यंदाच्या वर्षीही महापालिकेकडून श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद, अमोनियम बायकार्बोनेट यांसारख्या अशास्त्रीय पर्यायांचा पुरस्कार करण्यात येत आहे. दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या दिवशी ज्या भाविकांना गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करायचे आहे, त्यांच्यासाठी सुविधा नाही, तर अडथळ्यांची जंत्रीच पहायला मिळत होती. असे असूनही अनेक भाविकांनी दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या दिवशी नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास प्राधान्य दिल्याचे पहायला मिळाले. चिंचवड येथेही नदीला पाणी असल्याने जवळपास सर्व भाविकांनी गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन केले. प्रबोधन मोहिमेच्या अंतर्गत समितीचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे शास्त्र सांगणारे प्रबोधनात्मक फलक हातात धरून उभे होते. येथील ओंकारेश्वर मंदिराजवळील वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट, भिडे पूल, एस्.एम्. जोशी पूल या ठिकाणी, तर पिंपरी-चिंचवड परिसरात काकडे पार्क, वाल्हेकरवाडी, थेरगाव, मोरया गोसावी घाट या ठिकाणी मोहीम राबवण्यात आली.
खडकवासला धरणातून पाणी विलंबाने सोडले ?
श्री गणेशाच्या कृपेने पाऊस भरपूर झाल्याने आणि खडकवासला धरण भरल्याने नदीला पाणी सोडण्यात येणार होते; मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत तरी नदीला पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे महापालिकेने जाणीवपूर्वक धरणातून विलंबाने पाणी सोडले का ? धरणातून पाणी सोडण्याचा आणि अपेक्षित ठिकाणी पोहोचण्याचा कालावधी विचारात घेऊन तसे नियोजन का करण्यात आले नाही, असा प्रश्न काही भाविकांनी विचारला.
प्रतिसाद !
१. थेरगाव येथे एका घाटावर वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे शास्त्र एका जणांना सांगितल्यावर त्यांनी कृत्रिम हौदाकडे न जाता गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन केले आणि जातांना कार्यकर्त्यांना प्रसाद दिला. कार्यकर्त्यांच्या दोन्ही हातात फलक असल्याने ते म्हणाले, तुम्ही चांगले कार्य करत आहात. मीच तुम्हाला प्रसाद भरवतो आणि त्यांनी प्रसाद भरवला.
२. अनेक जण प्रबोधनात्मक फलक जिज्ञासेने वाचत होते.
३. श्री. चौगुले पाटील (भोई, होडी चालवणारे) यांचा होडी चालवण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. ते म्हणाले की, पूर्वी पुष्कळ जण वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करत असल्याने पूर्वी पुष्कळ होड्या होत्या; पण प्रशासनाने कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास प्रारंभ केल्यापासून त्यांच्या व्यवसायात घट झाली. आता परंपरागत व्यवसाय असल्याने ते ३ होड्या चालवत आहेत; पण काही वेळा पोलीस त्यालाही आडकाठी करतात. गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करू देत नाहीत. परंपरागत व्यवसाय जपण्यासाठी आम्ही अजूनही गणेशोत्सव कालावधीत होड्या चालवतो. पालिकेचे हे धोरण योग्य नाही.
महापालिकेचा भोंगळ कारभार
एस्.एम्. जोशी पुलाजवळील घाटांवर गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे भाविकांना श्री गणेशाची विसर्जनाच्या पूर्वीची आरती मूर्ती भूमीवर ठेवूनच करावी लागत होती. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षाकठडे उभारण्यात आले नव्हते. दिव्यांची सोय, तसेच अन्य मांडव उभारणी सायंकाळपासून करण्यास प्रारंभ केला गेला.
याच्या अगदी उलट चित्र वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटावर पहायला मिळाले. त्या ठिकाणी बांबू लावून सर्व परिसर इतका व्यापून टाकण्यात आल्या होता की, एखाद्या भाविकाने गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करायचे म्हटले, तर त्याला कसरत करतच त्या ठिकाणी जावे लागायचे. याशिवाय नदीत उतरून विसर्जन करण्यासाठी कर्मचारी अथवा होडीची सोय अपवाद वगळता उपलब्ध नव्हती.
भिडे पुलाजवळील घाटावर नदीकडे जाण्याच्या मार्गातच पत्रे आणि बांबू आणून टाकले होते, तसेच नदीपात्राकडे जाण्याचा रस्ताही ओबडधोबडच होता.
येथील आेंकारेश्वर मंदिराजवळील वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटांना जोडणार्या पुलावर एका ठिकाणी ४ मोठे दगड आणून ठेवण्यात आले होते.
भिडे पुलावर कर्मचारी मांडवात बसून होते; मात्र नदीत विसर्जन करणार्या भाविकांना साहाय्य करत नव्हते.
श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करणार्या भाविकांच्या प्रतिक्रिया
१. आम्ही शाडूमातीची गणेशमूर्ती बसवतो. त्यामुळे जलप्रदूषण होण्याचा प्रश्नच नाही.
२. हौदातील मूर्तींचे काय होते, त्या कशा उचलल्या जातात, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आम्ही गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन करतो.
३. एस्.एम्. जोशी पुलावर पेटकर कुटुंबीय पारंपरिक वेशात आले होते. त्यांच्याशी संवाद साधल्यावर ते म्हणाले, शासन नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी काही करत नाही. त्यांनी काही नाही केले, तरी आम्ही शास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यातच विसर्जन करणार. प्रसंगी आम्ही त्यासाठी दूरवर जाऊ; पण शास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यातच विसर्जन करू. आमचा लहान मुलगा आम्हाला गणेशमूर्तींचे बादलीतच विसर्जन करू, असा आग्रह धरत होता; पण आम्ही त्याला शास्त्र समजावून सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात