पालिका मुख्याधिकार्यांना निवेदन सादर
सातारा : वाई (जिल्हा सातारा) येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गणपती दान आणि कृत्रिम तलाव संकल्पनेला कडाडून विरोध दर्शवण्यात आला आहे. वाहत्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिका मुख्याधिकारी श्री. प्रसाद काटकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाप्रमुख श्री. संदीप जायगुडे, शहरप्रमुख श्री. संतोष काळे, संघटक श्री. संदीप साळुंखे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की . . .
१. प्रदूषणाचे कारण पुढे करत पालिकेने श्री गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जनास मज्जाव केला आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत.
२. प्रशासनाला कृष्णामाईची एवढीच काळजी आहे, हे पाहून आम्हाला आनंद होत आहे; मात्र प्रतिदिन लक्षावधी लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कृष्णामाईत सोडले जाते याविषयी पालिका प्रशासनाची भूमिका काय आहे ? पालिकेने याविषयी कोणती ठोस पावले उचलली आहेत ?
३. भाविकांनी पीओपीच्या मूर्ती घेऊ नयेत, दुकानदारांनी त्या विकू नयेत, कुंभारांनी त्या करू नयेत यासाठी पालिकेने कधी जनजागृती केली का ? केवळ भाविकांनी मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करू नये, यासाठी विरोध कशासाठी ?
४. गणेशमूर्ती पालिकेच्या जलकुंडात विसर्जिक केल्यानंतरही त्याची विटंबना होते, हे वाईकर नागरिकांनी अनुभले आहे. या वर्षीही पालिकेच्या या कृतीतून समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दु:खावल्या जातील, याची नोंद घेऊन पालिकेने स्वत:च्या निर्णयाचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा याविषयी तीव्र्र आंदोलन करण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात