Menu Close

ईदच्या निमित्त प्राण्यांच्या वाहतुकीविषयी काढलेल्या तुघलकी आदेशात पालट करण्यास वाहतूक पोलिसांना भाग पाडले !

भाजपच्या खासदार आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या विरोधाचा परिणाम !

मुंबई : ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांची कोणत्याही प्रकारे कागदपत्रांची तपासणी करू नये. प्राण्यांची वाहतूक करणार्‍या मुसलमान धर्मियांची अडवणूक करून त्यांना त्रास देणार्‍या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तुघलकी आदेश काढला होता. यावर प्राणी कल्याण मंडळाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी घेतलेला आक्षेप आणि हिंदुत्वनिष्ठांचा विरोध यांमुळे अखेर या आदेशामध्ये सारवासारव करून नवीन आदेश काढण्याची वेळ सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर आली. या नवीन निर्णयामध्ये प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याला प्रतिबंध करणार्‍या कायद्याच्या कार्यवाहीसाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (याचा अर्थ सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रथम काढलेला आदेश हा मुसलमानांचे लांगूलचालन करणारा आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्याला धाब्यावर बसवणारा होता, हे यातून सिद्ध होते. एका अधिकारी पदावरील व्यक्तीने अशा प्रकारचा आदेश काढणे म्हणजे सर्व प्रशासकीय यंत्रणेला चुकीच्या कार्यवाहीसाठी प्रवृत्त करण्यासारखे आहे. असा चुकीच्या आदेश काढणारे अमितेश कुमार यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

याविषयी खासदार पूनम महाजन यांनी तीव्र आक्षेप घेऊन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे तक्रार केली होती. कत्तलीसाठीच्या पशूंच्या वाहतुकीविषयी कायदेशीर तरतुदी आहेत. त्या २ दिवसांसाठी स्थगित ठेवता येणार नाहीत. सहआयुक्तांचे परिपत्रक अनधिकृत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर याविषयी सुधारित आदेश काढण्यात आला.

नवीन आदेशातही मुसलमानांंचे लांगूलचालन !

सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी काढलेल्या आदेशामध्ये केवळ ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०’ या अधिनियमाचाच उल्लेख केला आहे. राज्यात ज्याप्रमाणे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा अस्तित्वात आहे, तसा गोवंश हत्या बंदी कायदाही अस्तित्वात आहे. ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात गोवंशांची वाहतूक होते; मात्र त्याविषयी साधा उल्लेखही आदेशामध्ये करण्यात आलेला नाही. तसेच यापूर्वी २६ ऑगस्ट काढलेल्या आदेशामध्ये पोलिसांवर कारवाई करण्याची तंबी देण्यात आली होती. २८ ऑगस्टच्या नवीन आदेशात ‘२६ ऑगस्टच्या आदेशाचे पालन करतांना’ असाही उल्लेख करण्यात आला आहे आणि दुसर्‍या बाजूला ‘प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियमाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांना सहकार्य करावे’, असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी नेमके काय करावे, असा संभ्रम निर्माण करणारा हा आदेश आहे. या नवीन आदेशातही गोवंश हत्या रोखण्याविषयी पोलिसांना स्पष्ट आदेश न देता, ‘पोलिसांना सहकार्य करावे’, असे गोरक्षकांनाच सुनावण्यात आले आहे. त्यामुळे कायद्याचे पालन व्हावे, यापेक्षा मुसलमानांच्या लांगूलचालनास बाधा येणार नाही ना ? हीच काळजी या आदेशामध्ये घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच हिंदूहिताचा एकमात्र उपाय !

यापूर्वी प्रशासनाकडून शासकीय कार्यालयांमध्ये श्रीसत्यनारायणाची पूजा घालू नये, राज्यात कुठेही राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारतांना तेथील अल्पसंख्यांकांची अनुमती घेण्यात यावी, असे हिंदुद्रोही आदेश काढण्यात आले होते. हिंदुत्वनिष्ठांचा विरोध आणि जनक्षोभ यांमुळे शासनाला ते मागे घ्यावे लागले. या निर्णयाप्रमाणे आता सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही गोहत्येला प्रोत्साहन देणारा आदेश काढला. यातून प्रशासनाकडून जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात निर्णय घेण्यात येत असल्याचे दिसून येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *