अमृतसर : लाहोरमधील ऐतिहासिक जैन मंदिर मेट्रो रेल्वेसाठी जमीनदोस्त करण्यात आले असून पाकिस्तानातल्या विरोधी पक्षांनी याचा निषेध केला आहे. पंजाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते मियाँ मेहमूद उर रशीद यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रशीद यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि हे ऐतिहासिक मंदिर जतन का करण्यात आले नाही असा प्रश्न विचारला आहे. पंजाब सरकारने ऑरेंज लाइन मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पासाठी जैन मंदिर, महाराजा बिल्डिंग आणि कपुरथाला हाऊस या इमारतीही जमीनदोस्त केल्या आहेत. मेट्रो रेल्वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी लाहोरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या जैन मंदिराचे जतन करणेही सरकारचे कर्तव्य होते असे मत रशीद यांनी व्यक्त केल्याचे टाइम्सने म्हटले आहे.
पाकिस्तामधील तेहरीक ए इन्साफ, पाकिस्तान मुस्लीम लीग (क्यू), जमात ए इस्लामी आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांनी या घटनेचा निषेध केला आणि निदर्शने केली आहेत.
याआधीही जैन मंदिराला काहीवेळा संकटांना सामोरे जावे लागले होते. बाबरी पतनानंतर बदला म्हणून या मंदिराचा खूपसा भाग जमावाकडून तोडण्यात आला होता. नंतर अनेक दुकानदारांनी मंदिराच्या आवारात अतिक्रमण केले होते, तर मंदिराच्या एका खोलीत एक मदरसाही चालवण्यात येत होता.
सरकार एका समाजाविषयीच अलिप्त आहे असं नाही तर ते शहराच्या ऐतिहासिक वारशाविषयीही अनभिज्ञ असल्याची टीका रशीद यांनी केली आहे.
संदर्भ : लोकमत