Menu Close

हिंदु तेज जागवणारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

काठमांडू येथील ज्योतिर्लिंग पशुपतिनाथ मंदिराचे मुख्यपुजारी (डावीकडे) श्री. गणेश भट्ट आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

काठमांडू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी १८ ते २८ ऑगस्ट या काळात नेपाळचा दौरा केला. या कालावधीत त्यांनी काठमांडू येथे ५ व्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधप्रबंध सादर केला, चतुर्थ राष्ट्रीय पंडित संमेलनामध्ये सहभाग घेतला. या समवेतच अनेक धर्मप्रेमी मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचा वृत्तांत येथे देत आहे.

‘नेपाल अकादमी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’चे उपकुलपती श्री. जीवराज पोखरेल यांची भेट

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी काठमांडू येथील ‘नेपाल अकादमी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’चे उपकुलपती श्री. जीवराज पोखरेल यांची भेट घेतली. या वेळी श्री. पोखरेल यांनी नेपाळमधील डांग येथील त्यांच्या शाखेत प्रथमच ‘पुरातन विज्ञान’ या विषयावर अभ्यास आणि संशोधन यांसाठी वेगळा विभाग चालू करण्याचा विचार असल्याचे संगितले. ‘या विषयावर गोवा येथील सनातनच्या आश्रमात संशोधन चालू आहे’, अशी माहिती सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी दिली आणि त्यांना आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण दिले.

‘डि.ए.व्ही. नेपाळ’ या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल केडिया यांची भेट

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी २२ ऑगस्ट या दिवशी ‘डि.ए.व्ही. नेपाळ’ या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल केडिया यांची भेट घेतली. या वेळी नेपाळमध्ये नवीन पिढीला धर्मापासून परावृत्त करण्यासाठी रचल्या गेलेल्या षड्यंत्राविषयी चर्चा करण्यात आली. श्री. केडिया यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित केले.

नेपाळमधील ‘डि.ए.व्ही. नेपाळ’ या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

काठमांडू येथील ‘डि.ए.व्ही’ नेपाळ’ या शैक्षणिक संस्थेत ‘यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिक उर्जेचे महत्त्व’ या विषयावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘केवळ भौतिक प्रगतीने सर्व साध्य झाले असते, तर पाश्‍चात्त्य आणि प्रगत राष्ट्रांमध्ये सर्वाधिक व्यसनाधीनता, गुन्हेगारी, घटस्फोट इत्यादींमध्ये वाढ झाली नसती, तसेच तेथील लोकांना सर्वाधिक मानसिक समस्या झाल्या नसत्या.’’

क्षणचित्रे

१. मार्गदर्शनाच्या वेळी उपस्थित विद्यार्थी संशोधकांना साधनेविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी ‘साधना म्हणजे काय ?’, ‘नामजप कोणता करावा ?’ इत्यादींविषयी शंकानिरसन करून घेतले.

२. ‘डि.ए.व्ही’ नेपाळ’च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील शंका उत्स्फूर्तपणे विचारल्या. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना समजेल, अशा भाषेत त्यांच्या शंकांचे निरसन केले. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी संपूर्ण मार्गदर्शन हिंदीतून केल्याविषयी हिंदी विभागाचे प्रमुख श्री. पुरुषोत्तम पोखरेल यांनी समाधान व्यक्त केले.

३. श्री. पुरुषोत्तम पोखरेल म्हणाले, ‘‘आमच्या मुलांमध्ये एवढी जिज्ञासा आहे, हे आम्हाला आज प्रथमच समजले. तुम्ही त्यांच्या आध्यात्मिक चिंतनाच्या प्रक्रियेला चालना दिली.’’

४. उपप्राचार्य श्री. रामचंद्र खनाल म्हणाले, ‘‘यापूर्वीही काही संंप्रदायाच्या अधिकारी व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे; पण ते एकतर्फी असायचे. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न कोणीच केला नव्हता.’’

पशुपतिनाथ मंदिराचे मुख्य पुजारी श्री. गणेश भट्ट यांची सदिच्छा भेट

काठमांडू येथे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी २० ऑगस्ट या दिवशी पशुपतिनाथ मंदिराचे मुख्य पुजारी श्री. गणेश भट्ट यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी भारतात गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाविषयी त्यांना माहिती दिली. श्री. गणेश भट्ट यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना स्वत:च्या घरातील देवघरात नेले. तेथे श्री. गणेश भट्ट यांनी धर्मप्रसार आणि हिंदु राष्ट्र यांसाठी करत असलेल्या कार्यासाठी सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या गळ्यात आशीर्वादरुपी रुद्राक्षाची माळा घातली.

क्षणचित्र : या भेटीच्या वेळी समवेत असलेले श्री. भरत शर्मा यांनी सांगितले की मुख्य पुजारी कोणालाच त्यांच्या देवघरात नेत नाहीत. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना मात्र ते त्यांच्या देवघरात घेऊन गेले.

त्रिभुवन विद्यापिठाच्या बायोटेक्नॉलॉजीच्या प्राध्यापिका डॉ. रजनी मल्ला यांची भेट

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी २५ ऑगस्ट या दिवशी त्रिभुवन विश्‍व विद्यालयातील बायोटेक्नॉलॉजीच्या प्राध्यापिका डॉ. रजनी मल्ला यांची भेट घेतली. या वेळी प्रा. डॉ. गंगा पोखरेल आणि काही संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी वैद्यकिय क्षेत्रात पुढच्या टप्प्यात असतांना त्याचा त्याग करून धर्म आणि अध्यात्म यांच्या क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतल्याविषयी प्रा. डॉ. गंगा पोखरेल यांना जिज्ञासा वाटली. या वेळी डॉ. गंगा यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. त्यांच्या शंकांचे निरसन करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘WHO’ने (जागतिक आरोग्य संघटनेने) ‘HEALTH’ ची व्याख्या करतांना ‘फिजीकल, मेंटल, सोशल अ‍ॅण्ड स्पिरिच्युअल वेलबिईंग ऑफ अ ह्युमन बिईंग’, (मनुष्याचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ) अशी केली आहे.’’

काठमांडू येथे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा श्री गणेश मिरवणुकीत सहभाग

श्री गणेशकचतुर्थीच्या निमित्ताने राष्ट्रीय धर्मसभा नेपाल यांच्याकडून २६ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशमूर्ती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत भारतातील कामाख्या उपासक पंडित दिवाकर शर्मा, राष्ट्रीय धर्मसभा नेपालचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आदी मान्यवर सहभागी झाले.

अन्य प्रतिष्ठित मान्यवरांच्या भेटी

नेपाळ दौर्‍यात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘लिडरशीप एशिया आणि टुडेज युथ एशिया’चे अध्यक्ष श्री. संतोष सहा, त्रिभुवन विश्‍वविद्यालयातील ‘मास काम्युनिकेशन’चे प्राध्यापक श्री. निर्मल अधिकारी, काठमांडू येथील ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष श्री. रुबयनाथ कोईराला यांच्याही भेटी घेतल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *