अमरावती : जिल्ह्यातील चिंचकुंभ येथे जनावरांची अवैध वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक उलटून ४२ जनावरे दगावली होती. या घटनेनंतर पसार झालेले इरफान खाँ इब्राहिम खाँ (३३), संजय प्रेमसिंह (३३), दोघेही रा. सुजालपूर, जि. साजापूर, मध्य प्रदेश यांना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. ११) घाटलाडकी येथून अटक केली. (धर्मांधांसह अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होणारे हिंदु हे हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत. – संपादक, हिंदु जागृती)
प्राप्त माहितीनुसार, १६ जानेवारीला जनावरांचे अमानुषपणे ताेंड पाय बांधून अवैधपणे वाहतूक करत असताना महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेलगत जिल्ह्यातील चिंचकुंभ येथे दहाचाकी ट्रक (एमपी ०९ एचएफ ३५७४) उलटला होता. यामध्ये ४२ जनावरे जागीच दगावली होती. केवळ दोन जनावरे सुदैवाने वाचली होती. घटना घटताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिनाभरापासून या घटनेतील आरोपींचा शोध सुरूच ठेवला होता. दरम्यान, या घटनेतील दोन्ही आरोपी घाटलाडकी येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. ही जनावरे राजस्थान येथून आणण्यात आली होती. त्यांची महाराष्ट्रात विक्री करण्याचा मनसुबा होता, अशी माहिती आरोपींनी तपासादरम्यान दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार अजय आखरे, पीएसआय संदीप आगरकर, कपिल खडसे करत आहेत.
संदर्भ : दिव्य मराठी