पुणे : गणेशमूर्ती विसर्जन हा विधी पूर्णतः हिंदु धर्मातील धार्मिक असून त्याच्याशी हिंदूंच्या धार्मिक भावना जोडलेल्या आहेत, तसेच राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. असे असतांना तथाकथित पर्यावरणवादी संघटना विविध शिक्षण संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हाताशी धरून कृत्रिम हौदामध्ये गणेशमूर्ती विसर्जन वा मूर्तीदान करण्यास सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून धार्मिक भावना दुखावण्याच्या कृत्याला हातभार लावल्यासारखे होते. तरी विद्यार्थ्यांना अशा धार्मिक भावना दुखावणार्या कार्यात हातभार लावण्यापासून थांबवावे आणि धर्महानी रोखावी. जर आपण असे केले नाही, तर कदाचित भविष्यकाळात गणेशमूर्तींची विटंबना होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. तरी आपण योग्य त्या खबरदारीपर सूचना विविध शिक्षण संस्था, शाळा आणि महाविद्यालये यांना द्याव्यात, असे मागणीपर निवेदन येथील शिक्षण संचालक यांच्या नावे पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांना २९ ऑगस्टला देण्यात आले.
या वेळी शिवसेना शाखाप्रमुख श्री. ऋषिकेश कुलकर्णी, गणेशभक्त श्री. अक्षय भेगडे, शिववंदना महासंघाचे श्री. विशाल आल्हाट, योग वेदांत समितीचे श्री. सुधाकर संगनवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रवीण नाईक हे उपस्थित होते. यावर टेमकर यांनी सांगितले की, तुम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुचवलेला भाग चांगला असून त्यासाठीचे परिपत्रक काढण्याचा प्रयत्न करतो.
त्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गणेशोत्सव हा पुण्याचा, तसेच संपूर्ण हिंदु धर्माचा मानबिंदू आहे. मागील वर्षी महाविद्यालयीन युवक त्यांच्या गणवेश आणि ओळखपत्रासह अन्य संघटनांसह सहभागी झाल्याचे निदर्शनास आले होेते.
या गणेशमूर्ती पालिकेच्या ‘कचरा भरण्याच्या’ गाडीतून वाहून नेल्या जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींची विटंबना होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. हे अतिशय गंभीर आणि हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच करणारे आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात